लातूर : झाेपेत असलेल्या एका ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा डाेक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लातुरातील रिंगराेडलगत असलेल्या एका फॅक्शन हाॅलनजीक घडली. रात्री उशिरापर्यंत मयत तरुणाची ओळख पटली नसून, पाेलिसांकडून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील बाभळगाव नाका ते सिकंदरपूर चाैक दरम्यान राॅयल फॅक्शन हाॅलनजीक एक ३५ वर्षीय तरुण गुुरुवारी रात्री झाेपी गेला हाेता. दरम्यान, रात्री १२ ते शुक्रवारी पहाटे ५ या वेळेत अज्ञात मारेकऱ्याने डाेक्यात माेठा दगड घातला. यामध्ये त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी या घटनेची माहिती विवेकानंद चाैक ठाण्याचे पाेलिस निरीक्षक संताेष पाटील यांना मिळाली. याबाबत माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली. लातूर शहर डीवायएसपी रणजित सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले हाेते. दरम्यान, मयत तरुणाची ओळख पटविण्याचा पाेलिसांकडून शुक्रवारी दिवसभर प्रयत्न सुरु हाेते.
तरुणाच्या अंगावर आहे टी-शर्ट आणि नाईट पॅन्ट...
मयत तरुणाच्या अंगात विटकरी रंगाचा टी-शर्ट, निळसर रंगाची नाईट पॅन्ट, काळी-पांढरी दाढी, काळसर रंगाची चप्पल असून, साडेपाच फूट उंची आहे. पाेलिसांकडून विविध पाेलिस ठाण्यांच्या दप्तरी नाेंद असलेल्या मिसिंगची तपासणी केली जात आहे. - संताेष पाटील, पाेलिस निरीक्षक, लातूर