लातूर : चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे पाण्याच्या टँकरमध्ये शिल्लक पाणी पाहायला गेलेल्या एका युवकाचा विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
वडवळ नागनाथ येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने विविध वार्डामध्ये पाणी वाटपासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याचे टँकर फिरवले जात आहेत. मंगळवारी सकाळी टँकरने पाणी वाटप सुरू असताना श्रावण बालाजी मस्के (वय २७) हा युवक टँकर मध्ये शिल्लक असलेले पाणी पाहण्यासाठी टँकरवर चढला होता. यावेळी महावितरणच्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शॉक लागून युवक गंभीर जखमी झाला.
जखमी युवकास लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, उत्तरीय तपासणी झाल्यावर सायंकाळी श्रावण मस्के यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पश्चात आई,वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.