लातूर : गतवर्षी हमीभावापेक्षा कमी भाव असल्याने हमीभाव केंद्रावर उडीद, मूग आणि सोयाबीन शून्य खरेदी झाली आहे.. मात्र, बाजारापेक्षा हरभऱ्याला हमीभाव केंद्रावर चांगला दर मिळाल्याने २ लाख ७२ हजार ८६७ क्विंटल हरभऱ्याची खरेदी हमीभाव खरेदी केंद्रांवर झाली आहे. १९ हजार ८९७ शेतकऱ्यांनी हरभरा हमीभाव केंद्रावर विकणे पसंत केले. त्यातून त्यांना १४५ कोटी ५७ लाख ४५ हजार ४४५ रुपये पेमेंट मिळाले आहे.
गतवर्षीही उडीद, मुगाचा पेरा कमी झाल्यामुळे हमीभाव केंद्रावर याची खरेदी होऊ शकली नाही. यंदाही उशिरा पाऊस पडल्याने उडीद-मुगाचा पेरा नगण्यच आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राला उडीद, मूग मिळेल की नाही, याची शाश्वती कमी आहे. तर सोयाबीनचा बाजारभाव हमीभावापेक्षा थोडा जास्त मिळाल्याने शेतकऱ्यांनी मार्केट गाठले. या दोन कारणांमुळे हमीभाव केंद्रांवर उडीद, मूग आणि सोयाबीनची खरेदी होऊ शकली नाही.
म्हणून झाली हरभऱ्याचीच खरेदीहमीभाव केंद्रांवर बाजारभावापेक्षा हरभऱ्याला हमीभाव जास्त मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील १९ हजार ८७२ शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांवर हरभऱ्याची विक्री केली. २ लाख ७२ हजार ८६७ क्विंटल हमीभाव केंद्रावर हरभरा खरेदी केला. त्यातून शेतकऱ्यांना १४५ कोटी ५७ लाख ४५ हजार ४४५ रुपये पेमेंट करण्यात आले. आता पुढील हंगामाची वाट पाहत आहोत, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी सोमासे यांनी दिली.
पावसाने ताण दिल्याने चिंता वाढली...उडीद, मुगाचा हंगाम तर गेलाच. सोयाबीनवर शेतकऱ्यांची मदार आहे. परंतु, गेल्या १५ दिवसांपासून पावसाने ताण दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. गतवर्षी सोयाबीनला म्हणावा तसा भाव मिळाला नाही. यंदा तर निसर्गाचीच वक्रदृष्टी दिसत आहे. दुपारच्या सुमारास सोयाबीनच्या माना पडत आहेत. जोमात आलेले पीक कोमात येत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.