लातूर : जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, असा कागांवा करीत बहुतांश पालक खासगी शाळांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे सरकारी शाळांची पटसंख्या घटत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शाळा गुणात्मक असल्याचे बेवनाळ शाळेने दाखवून दिले आहे. एवढेच नव्हे तर आमच्या शाळेत लिहिता, वाचता व संख्याज्ञान न येणारा विद्यार्थी दाखवा आणि रोख एक लाख रुपये मिळवा, असे आव्हानच सर्वांना दिले आहे. या शाळेची तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभर चर्चा होत आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील बेवनाळ येथे जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंत शाळा आहे. द्विशिक्षकी शाळेत २४ पटसंख्या असून, या शिक्षकांना चारही वर्गांच्या अध्यापनाचे कार्य करावे लागते. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ व्हावी म्हणून शिक्षक नेहमीच विविध उपक्रम राबवितात. त्यामुळे गुणवत्ता वाढीस मदत झाली आहे.
केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केंद्रप्रमुख प्रभाकर हिप्परगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षणातच प्रत्येक विद्यार्थ्यास वाचन, लेखन व संख्याज्ञान अवगत होणे महत्त्वाचे असल्याने त्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले. परिणामी, कांबळगा केंद्रातील बेवनाळ शाळेतील प्रत्येक विद्यार्थी वाचन, लेखन आणि संख्याज्ञानामध्ये पारंगत झाला आहे.
शाळेच्या प्रवेशाद्वारावर बक्षीसाचा फलकबेवनाळ शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास लेखन, वाचन करता यावे म्हणून तेथील शिक्षकांनी विविध उपक्रम राबविले आहेत. नैसर्गिकरीत्या उपलब्ध साहित्याचा वापर करीत गणितीय आकडेमोड करण्याची कलाही शिकविली आहे. त्यामुळे अवघड गणित मुले क्षणात सोडवित आहेत. त्यामुळे शाळेने प्रवेशद्वारावर वाचन, लेखन आणि संख्याज्ञान न येणारा विद्यार्थी दाखवा आणि लाख रुपये मिळवा, असा फलक लावला आहे.
आणखीन दोन शाळांची तयारीशिरुर अनंतपाळ तालुक्यातील कांबळगा केंद्रातील बेवनाळ शाळेने हा अशा प्रकारचा जिल्ह्यात पहिला उपक्रम राबविला आहे. त्याची दखल तालुक्यातील सावरगाव आणि बिबराळ जिल्हा परिषद शाळांनीही घेत असा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लवकरच या शाळा सर्वांच्या दृष्टीक्षेपात येतील.
पालकांचा ओढा वाढेलनवनवीन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत असल्याचे पाहून पालकांनाही आनंद होत आहे. त्यामुळे खासगी शाळांकडील ओढा कमी होऊन तो जि. प. शाळेकडे वाढेल. शिवाय, या उपक्रमाची प्रेरणा इतर शाळा घेऊन गुणात्मक वाढ करतील. त्यामुळे पटसंख्याही वाढेल. - प्रभाकर हिप्परगे, केंद्रप्रमुख