मुंबई - लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे लग्नासाठी बोहल्यावर चढण्याआधी तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबर विचार कितपत जुळतात हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर सुखी, आनंदी आयुष्य घालवायचे असेल तर लग्नाआधी या मुद्यांवर जोडीदाराबरोबर जरुर चर्चा करा.
- लग्नानंतर बहुतांश जोडप्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांवरुन मतभेद निर्माण होतात. ही एक सामान्य पण तितकीच गंभीर बाब आहे. दोघांपैकी कोणा एकाची कुटुंबासोबत राहण्याची इच्छा असते तर दुस-याला स्वतंत्र संसार हवा असतो. दोघांपैकी कोणी एक जण सासरच्या मंडळींकडून मिळणारा सल्ला महत्वाचा मानतात त्याचवेळी दुस-या जोडीदाराला ते पटत नसते. त्यामुळे लग्नानंतर आपण कुठे, कसं रहायचं या मुद्यांवर जोडीदारांबरोबर जरुर चर्चा करा.
- लग्नानंतर लैंगिक सुख खूप महत्वाचे असते. त्यामुळे लैंगिक आयुष्याबद्दलही जरुर चर्चा करा. अनेक विवाह मोडण्यामध्ये हे सुद्धा एक महत्वाचे कारण असते.
- अनेकदा लग्नानंतर जोडीदारांचे मुलांबद्दलचे विचार परस्परांशी जुळत नाहीत. मुलांच्या जन्माचे प्लानिंग, त्यांचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण याबद्दलच्या विचारात मतभिन्नता असेल तर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे याबद्दलही जरुर चर्चा करा.
- आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी अनेकदा स्वत:ची आर्थिक स्थिती लपवली जाते. पण पुढे जाऊन तोच वादाचा मोठा मुद्या बनतो. आयुष्यभर त्यावरुन ऐकून घ्यावे लागते. त्यामुळे लग्न करताना आपल्या जोडीदाराची आर्थिक स्थितीची सर्व माहिती घ्या. कारण आयुष्य जगण्यासाठी प्रेमाबरोबर पैसाही तितकाच महत्वाचा असतो. त्यामुळे जोडीदाराची बचत, गुंतवणूक याची जरुर माहिती घ्या.
- लग्नाआधी दोघांनी परस्परांच्या व्यावसायिक जबाबदा-या समजून घेणे आवश्यक असते. अनेकदा विवाह मोडण्यामध्ये प्रोफेशनल लाइफ खूप मोठे कारण असते. एखाद्यावेळी नोकरीच्या निमित्ताने बाहेर जावे लागते किंवा घरी यायला उशिर होतो अशावेळी जोडीदाराने समजून घेणे महत्वाचे असते.
- लग्न करणा-या जोडप्यांनी घराबद्दल भरपूर स्वप्ने रंगवलेली असतात. लग्नानंतर तुम्हाला कशा घरात रहायचे आहे, घराची सजावट कशी हवी ? त्याबद्दल जरुर चर्चा करा.