बॉस्टन- ध्वनी प्रदूषणाच्या परिणामांकडे आजवर फारसे लक्ष देण्यात आलेले नाही. मात्र गेल्या दशकभरापासून ध्वनी प्रदूषणाच्या परिणामांनी जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. मुख्यत: युरोपीय देशांमध्ये यावर विशेष संशोधन सुरु आहे. २०११ सालीच जागतिक आरोग्य संघटनेने वाहतुकीच्या आवाजामुळे पश्चिम युरोपातील लोकांच्या आरोग्यदायी जिवनातील सरासरी एक वर्षाचे आयुष्य कमी होईल असे निरीक्षण मांडले होते. २०१५ साली एन्व्हायर्नमेंटल हेल्थ या नियतकालिकामध्ये २०१५ साली प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये न्यू यॉर्क शहरामध्ये ध्वनीची तिव्रता ७३ डेसिबल असल्याचे नमूद करण्यात आले होते. घराबाहेरील ध्वनीची तिव्रता ५५ डेसिबलपेक्षा अधिक असेल आणि ७० डेसिबलपेक्षा अधिक गोंगाटाच्या सानिध्यात सतत राहिल्यास श्रवणशक्ती जाण्यासारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात, असे द एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीने म्हटले आहे.बॉस्टन युनिवसिर्टा स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ येथे संशोधन करणाºया एरिका वॉकर यांनी यासाठी बॉस्टन शहरतील ध्वनीप्रदूषणाच्या नोंदी घ्यायला सुरुवात केली आहे. काही ध्वनीलहरींचे नियंत्रण आपल्याला करता येणे शक्य नसल्याचे माझ्या अभ्यासातून लक्षात आले असे एरिका सांगतात. उदाहरण द्यायचे झाल्यास जेव्हा बस थांब्यावर लोक बसची वाट पाहात असतात तेव्हा जवळून जाणाºया वेगवान बसमुळे होणारी कंपनेही त्रासदायक असतात. त्यांचा लोकांवर परिणाम होत असतो. तसेच त्यातून निर्माण होणाºया प्रतिध्वनीचाही परिणाम होत असतो. त्यांचे मापन आणि नियंत्रण करणे शक्य नसते. आपल्या अभ्यासातून वॉकर यांनी नॉइजस्कोअर नावाचे अॅप तयार केले आहे. यामुळे कोणत्याही शहरातील ध्वनीची तीव्रता मोजता येणे शक्य होणार आहे. या अॅपमुळे ध्वनीची सर्व सखोल माहिती नोंदली जाईल तसेच तेथील ध्वनीप्रदूषणाचे कारण असणाºया घटनांचे फोटो, व्हीडीओ काढून पाठवण्याची सोयही ते अॅप वापरणाऱ्या व्यक्तीला मिळणार आहे. बॉस्टनप्रमाणेच न्यू यॉर्क या शहरामध्ये ३११ या हेल्पलाइनवर सर्वाधीक तक्रारी ध्वनीप्रदूषणाच्या बाबतीतच येत असतात. न्यू यॉर्क विद्यापीठाच्या सेंटर फॉर अर्बन सायन्स अँड प्रोग्रेसने शहरातील इमारतींजवळ ध्वनीची तिव्रता मोजणारी लहान उपकरणे लावली आहेत. तसेच ५० हून अधिक सेन्सर्सद्वारेही लक्ष ठेवण्यात येते. या सेन्सर्समुळे आवाज नक्की कोणत्या कारणामुळे येत आहे त्या स्त्रोतापर्यंत जाणे शक्य होते, उदाहरणार्थ कुत्रा भुंकणे किंवा बांधकामावरील कामगार कोठे ड्रीलिंग करत आहे हे समजते असे या विभागातील संशोधक जस्टीन सॅल्मन यांनी सांगितले. हे देश ध्वनीप्रदुषणाबाबत इतके सजग असताना आशियाई देशांनी किती काळजी घ्यायला हवी याचा अंदाज करायला हवा.
ध्वनी प्रदुषणामुळे पाश्चिमात्य देशातील संशोधक चिंतेत, भारत कधी लक्ष देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 11:26 AM