न्यू यॉकर्- तुम्ही दररोज भरपूर वेळ शॉवरखाली किंवा गरम पाण्यानं, सुवासिक साबणानं, उटण्यानं अंघोळ करत असाल, पण म्हणजे तुम्ही स्वच्छ झालात असे नाही. आपण प्रत्येक जण स्वत:चा असा एक सुक्ष्मजीवजंतू, विषाणू, जीवाणू, बुरशी, रसायनांनी बनलेला एक ढग बरोबर घेऊन जात असतो. आपल्याबरोबर हे सुक्ष्मजीव, वनस्पतींचे अंश, रसायने आयुष्यभर फिरत असतात असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.यामध्ये काही स्वयंसेवकांना दिवसभर परिधान करण्यासाठी एक यंत्र देण्यात आले होते. दिवसभरात ती व्यक्तीच्या भोवतीच्या वातावरणातील नमुने त्याद्वारे घेण्यात आले. त्या नमुन्यांचे जेनेटिक अनालसिस करण्यात आल्यानंतर प्रत्येक माणूस बॅक्टेरिया, व्हायरस, बुरशी, रसायने, वनस्पतींचे सूक्ष्मअंश आणि इतकेच नव्हे तर अत्यंत सुक्ष्म प्राणीही आपल्याबरोबर वागवत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या लोकांच्या नमुन्यांमध्ये फरक असल्याचेही दिसून आले. हा एक अत्यंत रोचक अभ्यास म्हणावा लागेल असे मत न्यू यॉर्कच्या साऊथ नासाऊ कम्युनिटिज हॉस्पिटल येथील चिफ आॅफ मेडिसिन डॉ. आरोन ग्लॅट यांनी व्यक्त केले. ते इन्फेक्शियस डिसिजेस सोसायटी आॅफ अमेरिकाचे प्रवक्तेही आहेत. या अभ्यासामुळे कोणते वातावरण आपल्या आरोग्याला घातक आहे हे समजणे सोपे जाईल असे ग्लॅट यांनी याबद्दल मत व्यक्त केले.पर्यावरणाचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल अभ्यास होणं गरजेचं आहे, असे स्टॅनफर्ड युनिवर्सिटी स्कूल आॅफ मेडिसिन येथील वरिष्ठ संशोधक मायकल स्नायडर यांनी मत व्यक्त केले. जंतूंच्या या ढगाचा अभ्यास करण्यासाठी एक काड्यापेटीएवढे यंत्र १४ लोकांना देण्यात आले होते. हे यंत्र हाताला लावून हे लोक सर्वत्र जात असत. स्नायडर यांनीही हे यंत्र २ वर्षे वापरले. या यंत्रात अनेक फिल्टर बसवण्यात आले होते. त्या फिल्टरनी आसपासच्या वातावरणातील नमुने गोळा केले या नमुन्याचा जेनेटिक अनालसिस आणि केमिकल प्रोफायलिंगसाठी वापर करण्यात आला. जंतूंबरोबरच प्रत्येक व्यक्तीच्या आसपास डीईईटी हे किडे मारणारं रसायन असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते सर्वत्र पसरल्याचं दिसल्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला असे स्नायडर म्हणतात. त्यांच्या घरातच जीवाणूंपेक्षा बुरशीचे अंश जास्त असल्याचं आढळलं
प्रत्येकाचा असतो 'स्वत:चा असा जंतूंचा ढग'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 4:14 PM