नवी दिल्ली- केसांची व त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी ब्रॅण्डेड प्रोडक्ट वापरतो. पण हे ब्रॅण्डेड प्रोडक्ट तितकेच महाग असतात. त्यातच ते जीएसटीच्या कक्षेत आल्यानंतर त्याच्या किंमती अजून वाढल्या होत्या. पण आता तुम्हाला तुमच्या केसांची व त्वचेची काळजी घेणं स्वस्तात पडणार आहे. सरकारने केसांसाठी व त्वचेसाठी वापरात येणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे. 28 टक्क्यांवरून जीएसटी आता 18 टक्के करण्यात आला आहे. केसांची काळजी घेण्यासाठी वापरात येणारे शॅम्पू, हेअर क्रिम, हेअर डाय,(नॅचरल, हर्बल) कंडिशनर, तसंच हेअर स्ट्रेटनिंग मशिन, हेअर वेविंग मशिनवरील 28 टक्के जीएसटी हटवून तो 18 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे केसांची योग्य काळजी घेण्यासाठी लागणारा खर्च आता जरा कमी होईल. तसंच हेअर स्ट्रेटिनिंग मशिन, हेअर वेविंग मशिनवरील जीएसटीसुद्धा कमी झाल्याने तुम्हाला हवा तसा लूकही करता येणार आहे.
तसंच स्कीन प्रोडक्टवरचा जीएसटीही 28 टक्क्यावरून 18 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रोडक्ट खरेदी करताना आता जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. मेकअपचं सामान, सनस्क्रीन लोशन, सनटॅनिंग लोशन, मेनिक्युअर, पेडीक्युअरच्या सामानावरील 28 टक्के जीएसटी कमी करून तो आता 18 टक्के करण्यात आला आहे. पण काजळ, सिंदूर, टिकली, अलता यावरील 28 टक्के जीएसटी मात्र अजूनही कायम आहे. त्यामुळे आता केसांच्या आता त्वचेसाठीच्या प्रोडक्टवर जास्त पैसे खर्च करण्याची चिंता मिटणार आहे.
जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर आकारण्यात येणा-या जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. 227 पैकी फक्त 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. अन्य 177 वस्तू 28 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमधून 18 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे च्युईंगम ते डिटरजंटपर्यंत वस्तू स्वस्त झाल्या आहेत.