नवीन वर्ष सुरु झालं की अनेकजण नवनवीन संकल्प करतात. नव्या वर्षात हे संकल्प पूर्ण करायचे असा प्रत्येकानेच चंग बांधलेला असताे. त्यातच नवीन वर्षी जाॅगिंग सुरु करण्याचा बऱ्याच जणांचा संकल्प असताे. परंतु दाेन दिवसानंतर कंटाळा आला की पुन्हा बंद केले जाते. खाली दिलेल्या सात पद्धतीने तुम्ही जर जाॅगिंग केलंत तर तुमचा कंटाळाही दुर हाेईल आणि तुमचा संकल्पही तुम्हाला पूर्ण करता येईल.
टेकडीवर करा जाॅगिंग
तुम्हाला ट्रेड मिलवर किंवा बगीच्यामध्ये पळून जर कंटाळा आला असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या टेकडीवर जाॅगिंगसाठी जाऊ शकता. त्यामुळे एकतर तुम्हाला शुद्द हवा मिळेल आणि दुसरी गाेष्ट उंचावरुन तुम्हाला निसर्ग साैंदर्य देखील पाहता येईल.
हेडफाेन्सचा करा वापर
गाणी ऐकत तुम्ही जाॅगिंग करु शकता. त्यामुळे तुमचा मूडही फ्रेश राहिल आणि तुमच्या आवडीची गाणी सुद्धा तुम्हाला ऐकता येतील. चांगले हेडफाेन्स वापरले तर तुम्हाला याचा अधिक आनंद घेता येईल. परंतु जर तुम्ही रस्त्याने जाॅगिंग करणार असाल तर हेडफाेन्सचा वापर करु नका. वाहनांचा आवज न आल्यास अपघात हाेण्याची शक्यता असते.
मित्रांसाेबत करा जाॅगिंग
एकट्याला जाॅगिंगला जायला नेहमीच कंटाळा येताे. त्यामुळे दाेन - तीन दिवसानंतर जाॅगिंग बंद केले जाते. तुम्ही तुमच्या मित्रांसाेबत जाॅगिंग केल्यास तुम्हाला जाॅगिंगसाठी काेणीतरी साेबती मिळेल तसेच तुम्हाला कंटाळा देखील येणार नाही.
चांगल्या शूजचा करा वापर
जाॅगिंग करताना चांगले शूज वापरणे आवश्यक असते. कंफर्टेबल शूज असतील तर तुम्हाला जाॅगिंग करताना अडचणी येत नाहीत. तसेच पायही दुखावणार नाही. त्यामुळे चांगल्या शूजचा वापर जाॅगिंगसाठी करा
सिन रन्स
त्याच त्याच ठिकाणी जाॅगिंग करुन कंटाळा आला असेल आणि तुमच्या आजूबाजूला समुद्र किंवा एखादा तलाव, धरण असेल तर त्या बाजूने तुम्ही जाॅगिंग करु शकता. त्यामुळे तुमचा मूड देखील खुश राहील आणि तुम्ही जाॅगिंगचा देखील आनंद घेऊ शकाल
तुमच्या कुत्र्यासाेबत करा रनिंग
तुमच्याकडे जर एखादा कुत्रा असेल तर तुम्हाला काेणाच्या साेबतीची गरज नाही. तुम्ही तुमच्या कुत्र्याला घेऊन जाॅगिंगला जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला जाॅगिंगचा कंटाळा येणार नाही.