लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : केंद्र सरकारच्या प्रस्तावित तीन तलाक कायद्याविरोधात शहरात मुस्लिम महिलांची अभूतपूर्व रॅली तहसील कार्यालयावर काढण्यात आली़ तहसीलवर काढण्यात आलेल्या रॅलीत महिलांनी तीन तलाक कायद्याविरोधातील फलके हातात घेवून सहभाग नोंदविला़ शांततेत, सुनियोजनाने महिलांचा सहभाग लक्षणीय होता़शहरात मुस्लिम महिला व सुन्नी जमीयतुल उलेमा कमिटीच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली़ यात महिला शिस्तबद्ध, रांगेत तहसीलकडे जात होत्या़ तीन तलाक विधेयकाच्या माध्यमातून केंद्र सरकार महिलांची दिशाभूल करीत आहे़ मुस्लिम वैयक्तिक कायद्यात शासन ढवळाढवळ करीत आहे़ दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर व गोहत्याच्या नावाखाली निष्पाप नागरिकांचे बळी घेणाºयाविरूद्ध तत्काळ योग्य ती कारवाई करावी, अशा विविध मागण्यांचे फलक महिलांनी हातात घेतले होते़ तीन तलाक विधेयकाचा निषेध करण्यात आला़ हे विधेयक तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली़या रॅलीचे नेतृत्व आलेमा कौसरबाजी यांनी तर संयोजन मौलाना मुराद रिजवी यांनी केले़ मागण्यांचे निवेदन प्रभारी तहसीलदार ए़एम़ मोकले यांना आलेमा कौसरबाजी, प्रा़चित्रा लुंगारे, सय्यदा अमरीन, सालेहा मो़ मजहरोद्दीन, समरीन वजीरोद्दीन, झेबुन्नीसा म़ नजीबोद्दीन, रिजवाना बाजी, सुलताना बेगम, निलोफर बेगम, फातेमा बेगम आदींनी दिले़या रॅलीला राकाँचे नेते माजी आ़ शंकर धोंडगे यांनी पाठिंबा दिला होता़ रॅलीत विविध सामाजिक संघटना, पक्षांनी पाठिंबा दिला़ अजीमोद्दीन, असीम रजाक, हफीज मुसा, हफीज अहेमद, हफीज मगदूम, हफीज मतीन आदींनी परिश्रम घेतले़ पो़नि़ संदीप भारती यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता़मुस्लिम समाजाचे शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी आदी प्रश्नाकडे लक्ष द्यावे आणि सर्वांगीण विकास करण्यासाठीचे धोरण आखून त्याची अंमलबजावणी करावी, इस्लामी शरीयतमध्ये हस्तक्षेप हा सहन करणार नसल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या़ सिरीया देशात निष्पाप नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यात लहान मुले, वृद्धांना लक्ष्य केले जात आहे़ हा मानवजातीला काळीमा असून भारत सरकारने हल्ले थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करण्याची मागणी निवेदनाद्वारे सुन्नी जमीयतुल उलेमा कमेटीने यावेळी केली़शिस्तीत रॅली : मानवतेची शिकवणशहरातील दर्गाहपासून निघालेल्या रॅलीने मुख्य रस्त्यावरून तहसील कार्यालयावर येत असताना अंत्यसंस्कारासाठी घेवून जात असलेल्या शवाला अतिशय शिस्तीने मार्ग मोकळा करुन दिला. हे पाहून अनेकांनी मानवतेची शिकवण व त्याचे अनुकरण केल्याबद्दल महिलांचे कौतुक केले जात होते़ शहरात सर्वधर्म- समभावाची अनुभूती आल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या़
तीन तलाक कायद्याविरोधात मुस्लिम महिलांची रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:33 AM