संकलन : प्राजक्ता पाटोळे-खुंंटे
उन्हाळ्यातील गर्मीबरोबर कमी होत जाणारा डोक्यातील कोंडा हा थंडी पडू लागताच पुन्हा डोके वर काढतो. डोक्यात कोंडा होणे ही तक्रार खूपदा आढळते. केसांची निगा राखली नाही की डोक्यात खाज येणे, केस गळणे, चिडचिड होणे, कोंडा होणे, त्वचेला जखमा होणे अशा गंभीर समस्या सुरु होतात. त्यासाठी हिवाळ्यात केसांची खूप काळजी घेणे गरजेचे आहे.हिवाळ्यामध्ये कोंडा जास्त प्रमाणात होतो. कोंडा म्हणजे त्वचेच्या वरच्या थराच्या पेशींचे पुंजके असतात. या त्रासामागे मुख्य कारण म्हणजे यीस्ट नावाची बुरशी असते. यीस्ट ही बुरशी शरीरावर सर्वत्र आढळते; मात्र कोंडा होण्यामागे त्याची एकच प्रजाती कारणीभूत असते. कंगव्याच्या व कपड्यांच्या संसर्गाने कोंडा-बुरशी एकमेकांना लागते.विशेषत: स्त्रियांमध्ये डोक्यात कोंडा होण्याचे प्रमाण अर्थात जास्त आढळून येते. मस्तकाच्या त्वचेच्या पेशी शरीरातील इतर ठिकाणी असलेल्या त्वचेच्या पेशींप्रमाणेच खालच्या थरातून वरच्या थरात सरकत येत असतात. मग त्या बाहेर टाकल्या जातात. या पेशी अतिसूक्ष्म असल्यामुळे साध्या डोळ्यांना दिसत नाहीत. अंघोळ करताना त्या निघून जातात. स्त्री असो की पुरुष असो, दोघांमध्येही टेस्टेस्टेरॉन हार्मोन तयार होत असते. हे टेस्टेस्टेरॉन ५ डायहायड्रो टेस्टेस्टेरॉन (५ डीएचटी) मध्ये रूपांतरित होते. हे रसायन सीबॅसीयस किंवा तैलग्रंथीना चालना देणारे असते. या तैलग्रंथी त्वचेमध्ये असतात. हे सिबम त्वचेमधून पाझरायला लागते. मस्तकाच्या त्वचेतील निर्जीव पेशी बाहेर पडून जात नाहीत. त्या या तेलकट सीबममुळे केसांमध्येच एकमेकांना चिकटतात. त्यालाच आपण कोंडा म्हणतो. मस्तकाच्या त्वचेत यीस्टसारखे सूक्ष्म जंतू कायम वस्तीला असतात. ते या कोंड्याच्या खाली मोठ्या संख्येने वाढतात. त्यामुळे डोक्याला खाज येते. रोज केसांना तेल लावल्याने कोंडा होत नाही. तेलापेक्षा हे सीबम खूप वेगळे असते उलट रोज केसांना तेल लावल्याने आणि केस विंचरल्याने केसांमधला कोंडा काढून टाकण्यास मदतच होते. पण कंगवा जास्त वेळा फिरवू नये. त्यामुळे इन्फेक्शन दुसरीकडे पसरू शकते. नखाने डोके खाजवल्यामुळे त्वचेचे बॅक्टेरीअल इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये केसांची काळजी घेणे गरजेचे असते.