वॉशिंग्टन : मातेच्या गर्भातील बाळाच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करून अमेरिकेतील डॉक्टरांनी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. जगातील ही अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा तेथील डॉक्टरांनी केला आहे.
अमेरिकेत मॅसॅच्युसेट्समधील बोस्टन येथे एका रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. गर्भातील बाळाला रक्तवाहिनीशी संबंधित (व्हेन ऑफ गॅलेन) एक विकार होता. मेंदूची शस्त्रक्रिया झाली नसती तर या बाळाच्या जन्मानंतर ते हृदयक्रिया बंद पडून किंवा पक्षाघाताने मरण पावण्याची शक्यता होती. त्यामुळे ३४ आठवड्यांची गर्भवती महिला केन्यत्ता कॉलमॅन हिच्या पोटातील गर्भात असलेल्या बाळाच्या मेंदूवर दहा डॉक्टरांच्या पथकाने अल्ट्रासाउंड तंत्राच्या साहाय्याने ही अतिशय अवघड शस्त्रक्रिया पार पाडली. त्यानंतर काही दिवसांनी केन्यत्ताने एका मुलीला जन्म दिला. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर डेरेन ऑरबॅक यांनी सांगितले की, या मुलीची प्रकृती उत्तम आहे.
दिल्लीतील एम्समध्ये गर्भातील बालकावर हृदयशस्त्रक्रिया
यंदाच्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात डॉक्टरांनी गर्भात असलेल्या एका बाळावर हृदयशस्त्रक्रिया केली होती.
त्या बाळाचे हृदय एखाद्या द्राक्षाच्या आकाराचे होते.
या शस्त्रक्रियेत हृदयाचे बलून डायलेशन करण्यात आले.
त्याद्वारे हृदयाच्या झडपेतील अडथळे दूर करण्यात आले होते.
अवघ्या ९० सेकंदाच्या या शस्त्रक्रियेसाठी अल्ट्रासाउंड तंत्राची मदत घेण्यात आली होती.
आजारावर होणार प्रभावी उपचार
गर्भातील बाळाला मेंदूच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित काही विकार असेल तर त्यावर तो जन्माला आल्यानंतरच उपचार केले जात.
मात्र आता मातेच्या गर्भात असतानाच बाळावर शस्त्रक्रिया करता येऊ लागल्याने या आजारावर अधिक प्रभावी उपचार करता येतील.