मिलिंद अमेरकर
खरेतर पाश्चिमात्य देशांतून हे फॅड भारतासारख्या सर्वाधिक तरुण असलेल्या देशात फोफावत आहे. पाश्चात्त्यांचे हे अंधानुकरण आहे. शरीरावर टॅटू काढण्यास लष्कर, सुरक्षा एजन्सी, पोलीस यासारख्या सेवांमध्ये मनाई आहे. लष्करात तसा कायदाच आहे. इतर क्षेत्रांत मात्र अशा प्रकारचा कुठचाही कायदा नाही, पण याबाबत समोरच्याच्या दृष्टिकोनाचा फरक पडतो. त्यातून मग एखाद्या उमेदवाराविषयी वेगळे मत तयार होऊ शकते. आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिक, पोलीस अधिकारी, कायदा, अंमलबजावणी, बँक, शिक्षण यासारख्या क्षेत्रात त्याचा विपरित परिणाम जाणवतो.
कुठच्याही फॅशनकडे बंडखोरी म्हणून पाहिले जाते किंवा त्याच्या आयुष्याकडे गांभीर्याने पाहण्याच्या दृष्टीबाबत शंका घेतली जाऊ शकते. त्यातूनच नोकरीची संधी गमवावी लागण्याची कधीकधी वेळ ओढवू शकते. मात्र, नोकरीच मिळणार नाही, असे होत नाही. हे त्या कामाचे स्वरूप, ठिकाण आणि कंपनीच्या आचारसंहितेविषयीच्या विचारधारेवर बरेचसे अवलंबून असते. त्यामुळे टॅटूचा करिअरवर परिणामच होत नाही, असे म्हणता येत नाही. लोकांशी थेट संबंध येणाऱ्या सेवापुरवठादार कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना काही आचारसंहिता पाळावी लागते. त्यामुळे अशा क्षेत्रात दर्शनी भागात टॅटू असल्यास त्याचा निश्चितच विचार केला जातो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना टॅटूचा कमी त्रास होतो. दागिन्यांना पूरक म्हणून महिलांच्या बाबतीत पाहिले जाते.
नोकरी देताना टॅटूचा कशा प्रकारे विचार केला जातो, याविषयी ३०० कंपन्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १३.८५ टक्के कंपन्यांनी कमी पसंती असेल, असे सांगितले. तर ०.३१ टक्क्यांनी अधिक संधी देण्याचे, तर २२.७७ टक्क्यांच्या मते टॅटू असल्याने त्यांच्या निर्णयात काहीच बदल होणार नाही, असे स्पष्ट केले. ३५.०८ टक्क्यांनी कामाच्या स्वरूपावरून ठरवू, तर २८ टक्क्यांच्या मते, हे टॅटूंची संख्या आणि शरीराच्या कोणत्या भागावर ते आहेत, यावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे, ७७ टक्के कंपन्यांनी टॅटू असलेल्या उमेदवाराला संधी देण्याबाबत निरुत्साह दाखवला. इतरांना अपमानित करणारे, वर्णभेदाचे प्रदर्शन करणारे टॅटू असल्यास निश्चितच अशा उमेदवाराला नाकारले जाते. कर्मचाºयाला शरीरावर टॅटू असणे याविषयी चुकीचे वाटत नसले तरी त्यामुळे ग्राहकाचे चुकीचे मत बनण्याची शक्यता असते. व्यवसाय पुढे नेण्यासाठी ग्राहकच महत्त्वाचा असल्याने कंपन्या अशा बारीकसारीक बाबींचा विचार करत असतात, हे निश्चित. यावर कुणी म्हणत असेल की, टॅटूवरून कुणी माझी पारख करत असेल तर अशा लोकांसाठी काम करण्याची माझी इच्छा नाही, तर दीर्घकाळासाठी त्यांना बेरोजगार राहावे लागेल. डॉक्टर, बँकर, सेवाक्षेत्रात टॅटूविषयी प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. मात्र, ग्लॅमर असलेल्या क्षेत्रात टॅटू हा त्या क्षेत्रात काम करणाºयांसाठी पूरक ठरतो. स्पोटर््स, मीडिया आणि चित्रपट क्षेत्राशी संबंध येणाºया व्यक्तींना यामध्ये कोणताच अडथळा येत नाही.विशीपासून चाळिशीपर्यंतची पिढी टॅटूच्या प्रेमात आहे. कोणतेही बदल हे नव्या पिढीपासूनच सुरू होतात. सुरुवातीला या बदलांना प्रस्थापित व्यवस्था नाकारते, मात्र हळूहळू हे बदल आपसूक व्यवस्थेचा भाग बनतात. कारण दृष्टिकोनातील फरक असतो, तो कालांतराने भरला जातो. टॅटूचेही तसेच आहे. तरुण पिढीमध्ये त्याची क्रेझ पाहता टॅटूचा करिअरवर पडणारा प्रभाव गळून पडेल, असे वाटते. पण, सध्या तरी काही आचारसंहिता पाळाव्याच लागतील. त्यामुळे कोणतीही आवडनिवड बाळगताना तिचा आपल्या आयुष्यावर काही परिणाम होणार आहे, त्याचा एकदा निश्चितच विचार नक्कीच करा. म्हणजे पुढचा अडथळा टळेल.
सध्याची पिढी ही वेगळा विचार करणारी आहे. त्यांच्या विचारांचा पगडा त्यांच्या वागण्याबोलण्याबरोबरच दिसण्यावरही जाणवतो. जनरेशन गॅपचा हा परिणाम आहे. पिढ्या दरपिढ्या तो दिसणारच आहे. सध्याच्या पिढीमध्ये टॅटूची भलतीच क्रेझ आहे. आपल्याकडे पूर्वी गोंदवण्याची पद्धत होती. ती एक धार्मिक, सांस्कृतिक बाब समजली जात असे. पण, आता ही कला लुप्त झाली आहे. तिची जागा टॅटूने घेतली आहे. ही फॅशन भलेही तुम्हाला अधिक भावत असेल, पण तिचा दूरगामी परिणाम तुमच्या आयुष्यावर, तुमच्या करिअरवर होत असेल तर ही फॅशन जरा जपूनच आजमावावी, असे सांगावेसे वाटते.
(लेखक हे करिअर समुपदेशक आहेत.)