भारतातील घरांमध्ये साधारणतः जेवण तयार करण्यासठी एलपीजी सिलेंडरचा वापर करण्यात येतो. अनेकदा आपल्या कानावर येत असतं की, गॅस लीक झाला किंवा गॅस लीक झाल्यानंतर व्यवस्थित खबरदारी घेतली नाही म्हणून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. अनेकदा फक्त व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे सिलेंडरचे स्फोट घडून येतात. यामध्ये अनेक लोकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. आज आम्ही तुम्हाला गॅस सिलेंडर लीक झाल्यानंर काही उपायांबाबत सांगणार आहोत. ज्यांमुळे कोणतीही दुर्घटना होणार नाही आणि समस्या दूर करण्यासाठीही मदत होईल.
या गोष्टींबाबत सावधानी बाळगा :
साधारणतः गॅसचं कनेक्शन घेतल्यानंतर संबंधित एजेंसीच्या व्यक्ती गॅसचा वापर करताना कोणत्या गोष्टींबाबत सावधानता बाळगणं गरजेचं असतं त्याबाबत माहिती देत असतात. फक्त किचनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीलाच नाही तर घरातील सर्व व्यक्तींनी ही माहिती व्यवस्थित ऐकून त्याबाबत सावध असणं गरजेचं असतं. यामुळे गंभीर परिस्थितीमध्ये उपाय करणं फायदेशीर ठरतं.
- गॅसचा वास येत असेल तर सर्वात आधी शांत रहा आणि पॅनिक होऊ नका.
- चुकूनही घरातील किंवा किचनमधील इलेक्ट्रिक स्विच किंवा अप्लायंसेस ऑन करू नका.
- किचन आणि घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडा.
- रेग्युलेटर चेक करा ऑन असेल तर लगेच बंद करा.
- रेग्युलेटर बंद केल्यानंतरही गॅस लीक होत असेल तर रेग्युलेटक काढून सेफ्टी कॅप लावा.
- नॉब व्यवस्थित चेक करा.
- गॅसचा वास बाहेर घालवण्यासाठी पंखा अजिबात सुरू करू नका.
- घरात जर एखादा दिवा किंवा अगरबत्ती सुरू असेल तर ते विझवून टाका.
- आपल्या डिलरशी संपर्क करा आणि त्याला याबाबत माहिती द्या.
- गॅसच्या कारणामुळे डोळे जळजळत असतील तर अजिबात डोळे चोळू नका. त्याऐवजी थंड पाण्याने डोळे धुवून टाका.
- तोंडावर कपडा बांधून ठेवा, त्यामुळे श्वासावाटे शरीरामध्ये गॅस जाणार नाही. अन्यथा तुम्हाला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
- अशावेळी खासकरून मुलांवर लक्ष ठेवा. त्यांना गॅस आणि इलेक्ट्रिक स्विचपासून दूर ठेवा.
आग लागली तर...
गॅस लीक झाल्यानंतर सिलेंडरमध्ये आग लागली तर एखादी चादर किंवा टॉवेल लगच पाण्यामध्ये भिजवा आणि त्यानंतर लगेच सिलेंडरवर टाका. त्यामुळे आग लगेच विझण्यास मदत होईल आणि कोणतीही मोठी जीवितहानी होणार नाही. प्रकरण हाताबाहेर गेलं असेल तर लगेच अग्निशमन दलाला याबाबत माहिती देणं योग्य ठरतं.