पॅरिस- सकाळी उठायचा कंटाळा त्यानंतर व्यायामाचा कंटाळा असं तुमचं आयुष्य असेल तर सावधान! तुम्ही आजिबातच व्यायाम करत नसाल तर तुमचं आयुष्य धोक्यात असेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओ या संस्थेने दिला आहे. जगातील श्रीमंत देशांमध्ये लोकांच्या जीवनशैलीमध्ये व्यायामाचा समावेशच नाही त्यामुळे प्रत्येक तीन महिलांमधील एका महिलेस व चार पुरुषांमधील एका पुरुषाला हृदयरोग, मधुमेह, कर्करोग यांचा धोका निर्माण होईल अशी भीती या संघटनेने व्यक्त केली आहे. जर व्यायाम केला नाही तर या रोगांचा सामना करावा लागेल असा 1.4 अब्ज प्रौढांना इशारा देण्यात आलेला आहे.अपुऱ्या शारिरीक हालचालींमुळे आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली असून त्यामुळे मानसिक आरोग्य व जीवनाच्या गुणवत्तेवर (क्वालिटी ऑफ लाईफ) परिणाम होईल असे द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नल या जगप्रसिद्ध आरोग्य नियतकालिकामध्ये लेखात म्हटले आहे.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने एका आठवड्याभरात प्रौढ व्यक्तीने मॉडरेट इन्टेसिटी म्हणजे मध्यम तीव्रतेचे उदाहरणार्थ ब्रिस्क वॉकिंग, पोहणे, कमी वेगात सायकल चालवणे अशा प्रकारचे व्यायाम 150 मिनिटे तरी करायला हवेत. किंवा विगरस इन्टेन्सिटी (जोमदार ) व्यायाम 75 मिनिटे करायला हवेत. यामध्ये धावणे आणि सांघिक खेळांचा समावेश होतो.
श्रीमंत देशांमध्ये स्मृतीभ्रंश, हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार व्यायामाच्या अभावामुळे वाढत आहेत. गुथोल्ड यांच्यामते श्रीमंत देशांमधील जीवनशैलीचा व रोगांचा एक संबंध आहे. सतत चार भिंतींच्या आत राहाणे, ऑफिसमध्ये जास्त काळ काम करणे, जास्त उष्मांक असणाऱ्या अन्नाची सहज उपलब्धता, कमी व्यायाम असा एक स्पष्ट जीवनशैलीप्रकार शहरीकरणामुळे आलेला आहे.जसजसे देशाचे शहरीकरण होत जाते तसे लोक शेतीसारखे शारीरिक हालचालीचे व्यवसाय सोडून बैठ्या जीवनशैलीच्या शहरी वातावरणात जातात त्यामुळे त्याची नंतर भरपाई करावीच लागते असे त्या म्हणाल्या.कुवैत, अमेरिकन सामोआ, सौदी अरेबिया, इराक या देशातील एकूण प्रौढांपैकी निम्म्याहून अधिक प्रौढ शारीरिकदृष्ट्या पुरेसे कार्यरत नसल्याचे दिसून आले.