103 वर्षांचा नवरदेव, 49 वर्षांची नवरी; एकटेपणा दूर करण्यासाठी 'चाचा'ने थाटला तिसरा संसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 03:11 PM2024-01-29T15:11:53+5:302024-01-29T15:13:31+5:30
मध्य प्रदेशमध्ये राहणारे स्वातंत्र्यसैनिक हबीब नजर साहेब यांनी वयाच्या 103 व्या वर्षी तिसरे लग्न केले.
भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये राहणारे 104 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक हबीब नजर साहेब सध्या चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात दावा केला जातोय की, त्यांनी वयाच्या 103 व्या वर्षी तिसरे लग्न केले आहे. हा व्हिडिओ चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, त्यांनी लग्न केलेल्या महिलेचे वय 50 वर्षे आहे. त्यांच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेले आहे, पण व्हिडिओ आता चर्चेत आला आहे.
भोपाळमध्ये राहणारे स्वातंत्र्यसैनिक हबीब नजर उर्फ मंझले मियाँ मध्य प्रदेशातील सर्वात वयस्कर नवरदेव आहेत. त्यांनी गेल्यावर्षी वयाच्या 103 व्या वर्षी वृद्ध 49 वर्षीय फिरोज जहाँ यांच्याशी लग्न केले. वयाच्या या टप्प्यावर एकटेपणा दूर करण्यासाठी लग्न केल्याचे हबीब नजर सांगतात. सोशल मीडियावर या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होतोय, ज्यात ते ऑटोतून आपल्या पत्नीला घरी आणताना दिसत आहेत.
हबीब नजर यांचा नातू मोहम्मद समीर यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीला सांगितले की, त्यांचे आजोबा हबीब नजर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. 104 वय असून ते आजही पूर्णपणे निरोगी आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये त्यांना वाटले की, आपली काळजी घेण्यासाठी साथीदाराची गरज आहे. म्हणूनच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मंझले मियाँ नावाने प्रसिद्ध
मोहम्मद समीर पुढे सांगतात की, हबीब नजर यांच्या दोन पत्नींचे यापूर्वी निधन झाले आहे, यामुळेच त्यांनी फिरोज जहाँ यांच्याशी लग्न केले. आजमितीस हबीब नजर साब 104 वर्षांचे आहेत, तर त्यांची पत्नी फिरोज जहाँ 50 वर्षांची आहे. दोघांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले. हबीब नजर साहेब भोपाळच्या इतवारा भागात राहतात. परिसरातील लोक त्यांना मंझले मियाँ म्हणतात.