अभिलाष खांडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भोपाळ: मध्य प्रदेश सरकारच्या परिवहन, आरोग्य आणि आदिवासी कल्याण विभाग असलेल्या बहुमजली इमारतींपैकी एका इमारतीला सोमवारी संध्याकाळी आग लागली. यात १५,००० हून अधिक गोपनीय आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित फायली जळून खाक झाल्या. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेले सातपुडा भवन हे सहा मजली असून ही इमारत १९७० मध्ये बांधण्यात आली होती. या आगीमुळे काँग्रेसकडून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
अनेक सरकारी कार्यालये असलेली ही इमारत नऊ तास आगीच्या भक्ष्यस्थानी होती; पण राज्य सरकारची अग्निशमन यंत्रणा नादुरुस्त असल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. अनेक वर्षांपासून फायर ऑडिट झालेले नाही. रात्री उशिरा लागलेल्या या आगीवर रात्रीच नियंत्रण मिळविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून ही माहिती दिली आणि केंद्राची मदत मागितली. आगीसारख्या आपत्तीला तोंड देण्यासाठी अधिकृत यंत्रणांची तयारी नसल्याचे यातून उघड झाले आहे. सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही.
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आगीची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आरोप केला की, विविध विभागांतील भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्याचा हा डाव आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी याच सातपुडा भवनाला आग लागली होती. त्यात महत्त्वाच्या फायलींचे नुकसान झाले होते. यावर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुन्हा त्याच इमारतीला लागलेल्या आगीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
काँग्रेसला षडयंत्राची शंका
आगीमागे षडयंत्र असल्याची शंका काँग्रेसने व्यक्त केली आहे. माजी मंत्री अरुण सुभाष यादव यांनी ट्वीट केले की, आज प्रियंका गांधी यांनी घोटाळ्यांवर हल्लाबोल केला तेव्हाच सातपुडा भवनमध्ये भीषण आग लागली. आगीच्या बहाण्याने कागदपत्रे जाळण्याचा कट तर नाही ना, ही आग मध्य प्रदेशात बदलाचे संकेत देत आहे, असे यादव म्हणाले. दरम्यान, आपनेही या आगीमागे षडयंत्राची शंका व्यक्त करत आगीच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली.