मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लाडली बहन योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडली बहन योजनेमध्ये २१ ते २३ वर्षे वयाच्या महिला आणि तरुणींचा समावेश करण्याता निर्णय घेतला आहे, असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. त्याबरोबरच ज्या महिलांकडे पाच एकरपेक्षा कमी शेती आहे, पण ट्रॅक्टर असल्याने चार चाकीचा निकष लागून योजनेत समाविष्ट होऊ शकल्या नाहीत, अशा महिलांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. या महिलांनाही १००० रुपये आणि नंतर रक्कम वाढवल्यानंतरची वाढीव रक्कमही मिळणार आहे.
शिवराज सिंह चौहान हे श्यामला हिल्स स्थित उद्यानामध्ये २१ ते २३ वर्षे वयोगटातील महिला आणि तरुणींसह वृक्षारोपन कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की लाडली बहन योजनेंतर्ग खात्यामध्ये रक्कम जमा करण्यासाठी दर महिन्याची दहा तारीख निश्चित करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात १० ऑगस्ट रोजी रीवा येथून योजनेची रक्कम राज्यातील सर्व गाव आणि वॉर्डमध्ये राहणाऱ्या महिलांच्या खात्यात या योजनेमधील रक्कम टाकली जाईल. यादरम्यान, २१ ते २३ वर्षांपर्यंतच्या महिला, तरुणींच्या नोंदणीचीही सुरुवात होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये २५ जुलैपासून ५ यात्रांना प्रारंभ होणार आहे. या सर्व यात्रा वेगवेगळ्या गावातील माती आणि नदीचं पाणू घेऊन सागर येथे पोहोचतील. तसेच सागर येथे १२ ऑगस्ट रोजी भगवान संत रविदास यांच्या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.