कूनो नॅशनल पार्कमध्ये दोन महीन्यांत 6 चित्ते दगावले, उष्णता की पोषणाचा अभाव, कारण काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 03:56 PM2023-05-28T15:56:08+5:302023-05-28T15:56:32+5:30
गेल्या 2 महिन्यात एकाण 6 चीत्त्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या 17 चित्ते शिल्लक आहेत.
भारत सरकारचा 'प्रोजेक्ट चीता' चित्त्यांसाठी वाईट स्वप्न ठरत आहे. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये गुरुवारी (25 मे) आणखी दोन शावकांचा मृत्यू झाला आहे, तर एका पिल्लाची प्रकृती चिंताजनक असून त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यापूर्वीही एका पिल्लाचा मृत्यू झाला होता. ही सर्व पिल्ले मादी चित्ता 'ज्वाला'ची आहेत.
या तीन शावकांच्या मृत्यूसह आफ्रिकन देशातून भारतात आलेल्या एकूण 6 चित्त्यांचा गेल्या 2 महिन्यांत मृत्यू झाला आहे. पहिले 3 चित्ते वेगवेगळ्या कारणांमुळे मरण पावले. कुनो नॅशनल पार्कने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, 23 मे हा हंगामातील सर्वात उष्ण दिवस होता. जसजसा दिवस सरत गेला तसतसा उष्णता वाढत गेली आणि तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आणि ज्वालाच्या शावकांची प्रकृती ढासळत राहिली.
आजारी पिल्लाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्याला किमान एक महिना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत त्याच्या प्रकृतीत सुधारणा आहे. पण पूर्णपणे ठीक नाही. या पिल्लाला 1 महिना आई ज्वालापासून दूर ठेवण्यात येणार आहे. ज्वालाची सर्व पिल्ले अतिशय कमकुवत जन्माला आली होती, असेही सांगण्यात आले.
मरण पावलेली चित्त्याची पिल्ले सुमारे आठ आठवड्यांची होती. आठ आठवड्यांची पिल्ले साधारणपणे जिज्ञासू असतात आणि सतत आईच्या मागे लागतात. ही पिल्ले 8-10 दिवसांपूर्वी चालायला लागली होती. चित्ता तज्ज्ञांच्या मते, आफ्रिकेत चित्ताच्या शावकांचे जगण्याचे प्रमाण साधारणपणे फारच कमी आहे. शवविच्छेदन प्रक्रिया मानक प्रोटोकॉलनुसार केली जात आहे.
साशा, उदय आणि दक्ष यांचाही मृत्यू झाला आहे
नामिबियातून भारतात आलेल्या चित्त्यांपैकी एक असलेल्या साशाचा 27 मार्च रोजी मूत्रपिंडाशी संबंधित आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर उदयचा 13 एप्रिल रोजी कार्डिओपल्मोनरी फेल्युअरने मृत्यू झाला. यानंतर मादी चित्ता दक्षाचा दुसऱ्या चित्त्याशी झालेल्या भांडणात 9 मे रोजी मृत्यू झाला. सध्या आफ्रिकेतून भारतात आणलेल्या 20 चित्तांपैकी 17 आता शिल्लक आहेत. सात दशके नामशेष झाल्यानंतर देशात पुन्हा एकदा चित्त्यांची संख्या वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, चित्त्यांच्या मृत्यूनंतर 11 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.