राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या सुरक्षेत मोठी चूक, हाय सिक्युरिटी झोनमध्ये दोघे घुसले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 06:05 PM2023-07-13T18:05:10+5:302023-07-13T18:05:56+5:30
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ग्वाल्हेर दौऱ्यात चूक झाल्याची घटना घडली आहे.
ग्वाल्हेर: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ग्वाल्हेर दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना घडली. दोन मास्क घातलेल्या दुचाकीस्वारांनी हाय सिक्युरिटी झोनमध्ये प्रवेश केला. हे दोघे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या जय विलास पॅलेसच्या मुख्य गेटपर्यंत पोहोचले. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही सोडून दिले.
ही चूक मोठी होती, कारण ज्या वेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जय विलास पॅलेसमध्ये होत्या, त्या वेळी या भागातील एक किलोमीटर परिसरात एक हजाराहून अधिक पोलिस कर्मचारी उपस्थित होते. दुसरीकडे, या मास्क घातलेल्या दोघांनी सुरक्षेचे दोन टप्पे आधीच ओलांडले होते. तिसऱ्या टप्प्यात पोलिसांनी त्यांना रोखले नसते तर ते जयविलासच्या मुख्य गेटपर्यंत पोहोचले असते.
13 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पाहुण्या होत्या. जय विलास पॅलेसमध्ये त्यांनी कुटुंबासह शाही मेजवानी घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. शाही मेजवानीच्या आधी राष्ट्रपती मुर्मू यांनी जय विलास पॅलेसला भेट दिली. त्यांनी मराठा गॅलरी पाहिली, संग्रहालयाला भेट दिली आणि संपूर्ण इतिहास जाणून घेतला.