भोपाळ - देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकाकडे देशाचे लक्ष लागले होते. अखेर, निवडणुका पार पडल्यानंतर आज ४ राज्यांचा निकाल जाहीर होत आहे. दुपारपर्यंत समोर आलेल्या निकालानुसार भाजपने तीन राज्यात स्पष्ट बहुमताची आघाडी घेतली आहे. तर, तेलंगणात काँग्रेसने बीआरएसच्या गाडीवर स्वार होऊन बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. या निकालानंतर भाजपा समर्थक आणि नेत्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. तर, वरिष्ठ भाजपा नेत्यांनीही प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला. खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनीही निकालावर उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिली.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५ राज्याच्या विधानसभांचा कौल भाजपासाठी अधिक महत्त्वाचा होता. या निवडणुकांमधून जनतेचा कौल समजून घेऊन भाजपा पुढील २०२४ ची रणनिती ठरवणार आहे. त्यामुळेच, या निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले होते. ५ पैकी ४ राज्यातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून तीन राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसून येत आहे. या निकालावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीयमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला. आता, हिंदुत्त्वाचा विजय असल्याचे सांगत साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनीही उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिली.
''देशाच्या मनात मोदी आहेत, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या मनात मोदी आहेत. विकास, महिला सन्मान, राष्ट्र की रक्षा आणि हिंदुत्त्व आहे. भाजपच्या काळात काम झालंय, योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत, तेच तर आहे. काम बोलतंय, म्हणूनच पूर्ण बहुमताचं सरकार येत आहे,'' असे म्हणत खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकांच्या निकालावर उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिली. तसेच, हिंदुत्वाचा अजेंडा पसरवला जात असल्याचा आरोप केला जातोय? या प्रश्नावरही प्रज्ञा ठाकूर यांनी परखडपणे उत्तर दिलं.
हा हिंदूचा देश आहे, राहणारच, धर्माचा देश आहे, राहणारच आणि भाजपा धर्मासोबत आहे, असे म्हणत खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी भाजपच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.
गडकरींनीही सांगितला विकास
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. ''देशातील जनतेनं या निवडणुकांमधून आपला मूड दाखवून दिलाय. विशेषत: राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात भाजपला मोठं यश मिळालंय. मोदींच्या नेतृत्त्वात आमच्या सरकारने जी रणनिती ठरवली होती, त्यास जनतेनं एकप्रकारे समर्थन देत पाठिंबा केला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचं विशेष आभार मानतो, अभिनंदन करतो. तसेच, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचंही अभिनंदन करतो,'' अशी प्रतिक्रिया केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीदिली आहे.
फडणवीसांनीही व्यक्त केला आनंद
दरम्यान, आजच्या निकालानंतर भाजपा नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीयमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत एमपीच्या मनात मोदीच असल्याचं म्हटलं. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही थोडक्यात प्रतिक्रिया दिली. ''मी आत्ता एवढंच सांगेन, मी आनंदी आहे, यावर मी सविस्तर बोलेन, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ४ राज्यांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. तसेच, विकास आणि विश्वास, देश केवल मोदीजी के साथ, अशीही प्रतिक्रिया फडणवीसांनी ट्विटरवरुन दिली आहे.
निवडणूक निकाल अपडेट पाहा -