कपडे दिले, समजावलं अन् पोलिसांना बोलावलं; उज्जैनमधील पीडितेसाठी पुजारी बनला 'देवदूत'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 03:45 PM2023-09-28T15:45:39+5:302023-09-28T15:45:55+5:30
मध्य प्रदेशातील उज्जैन येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली.
मध्य प्रदेशातील उज्जैन येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. १५ वर्षीय चिमुकलीवर नराधमांनी अत्याचार केल्यानं संपूर्ण देश हादरला. एवढंच नाही तर आरोपींची क्रूरता एवढी की पीडित तरूणी ८ किलोमीटर नग्न अवस्थेत कपड्यांच्या शोधात फिरत राहिली. पण, दुर्दैव असं की कोणीच तिला आसरा दिला नाही. अखेर तिनं राहुल शर्मा नावाच्या पुजाऱ्याकडं मदत मागितली अन् तो पुजारी तिच्यासाठी देवदूत बनला. राहुल शर्मा हा उज्जैनपासून १५ किमी अंतरावर असलेल्या बडनगर आश्रमात असतो. पीडितेबद्दल बोलताना राहुलनं सांगितलं की, तो आश्रमातून घरी परतत असताना त्याला वाटेत पीडित तरूणी दिसली. तिच्या अर्ध्या शरीरावर कपडे नव्हते.
अंगावर काटा येणारं दृश्य पाहिल्यानंतर राहुल शर्मानं म्हटलं, "मी मुलीला पाहताच लगेच कपडे देण्यासाठी सरसावलो. तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं. तिला बोलता देखील येत नव्हतं आणि डोळे सुजले होते. मग मी १०० नंबरवर फोन केला. हेल्पलाईन क्रमांकावरून पोलिसांशी संवाद न झाल्यानं महाकाल पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. २० मिनिटांत पोलीस आश्रमाजवळ पोहचले." खरं तर उज्जैनच्या रस्त्यावर तरूणी नग्न अवस्थेत फिरत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
दरम्यान, राहुल शर्माने दाखवलेल्या धाडसामुळे पीडितेला धीर मिळाला. कायदेशीर प्रक्रियेत अडकण्याची पर्वा न करता राहुल शर्मा या पुजाराने तातडीने पोलिसांना बोलावले. उज्जैनमधील या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, पीडित तरूणी ही मध्य प्रदेशातील सतना येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ती तिच्या गावाहून उज्जैनला काही कामासाठी आली होती, पण इथे नराधमांनी तिच्यावर वाईट नजर टाकली. सध्या या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. हे सर्व आरोपी ऑटोचालक असल्याचे सांगण्यात येत आहे. राकेश या ३८ वर्षीय चालकालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्या रिक्षामध्ये रक्ताचे डाग आढळून आले.
पुजाऱ्याने सांगितली आपबीती
देवदूत पुजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी त्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण तिला बोलता देखील येत नव्हतं. त्याने तिला नाव विचारले, कुटुंबीयांबद्दल विचारले, तिला इथे सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. तो तिची माहिती विचारत होता परंतु ती खूप घाबरली होती. दरम्यान, कोणीही आले तरी ती खूप घाबरायची. पोलिसांना पाहून पीडितेच्या तोंडून शब्द देखील फुटत नव्हता.