धक्कादायक! दिवाळीला लक्ष्मीपूजन करत होत्या आपच्या नेत्या, तेवढ्यात पतीने केला गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 01:34 PM2023-11-13T13:34:23+5:302023-11-13T13:35:06+5:30
Madhya Pradesh Crime News: आम आदमी पक्षाच्या नेत्या रुची गुप्ता ह्या दिवाळीनिमित्त आपल्या फिटनेस सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांसह लक्ष्मी पूजन करत होत्या. त्याचवेळी त्यांचा पती तिथे आला आणि त्याने पिस्तूलामधून धडाधड गोळीबार केला.
देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, काल लक्ष्मीपूजनावेळी ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या रुची गुप्ता ह्या दिवाळीनिमित्त आपल्या फिटनेस सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांसह लक्ष्मी पूजन करत होत्या. त्याचवेळी त्यांचा पती तिथे आला आणि त्याने पिस्तूलामधून धडाधड गोळीबार केला. या गोळीबारामध्ये फिटनेस सेंटरमधील दोन कर्मचारी गोळ्या लागून जखमी झाले. ही घटना सिटी सेंटर परिसरात घडली असून, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
सिटी सेंटर परिसरातील रिव्हायटल मंत्रा फिटनेस सेंटर आणि ब्युटी केअरचं संचालन आम आदमी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा रूची गुप्ता करतात. रविवारी त्यांच्या फिटनेस सेंटरमध्ये त्या लक्ष्मी पूजन करत होत्या. त्यावेळी फिटनेस सेंटरमधील कर्मचारीही उपस्थित होते. तेवढ्यात तिथे रूची गुप्ता यांचे पती संदीप ठाकूर पोहोचले. संदीप ठाकूर यांच्याकडे पिस्तूल होते. तेवढ्यात संदीप ठाकूर यांची कुठल्याशा कारणावरून वादावादी झाली. त्यानंतर संदीप ठाकूर यांनी गोळीबार केला. पिस्तूलातून निघालेल्या गोळ्यांमुळे तिथे असलेले दोन कर्मचारी जखमी झाले.
रूची गुप्ता यांचे कर्मचारी निखिल शर्मा आणि उज्ज्वल त्यागी गोळ्या लागल्यामुळे जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित इतर कर्मचाऱ्यांनी संदीप ठाकूर यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तिथून फरार झाले, त्यानंतर या घटनेची माहिती त्वरित युनिव्हर्सिटी ठाणे पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी आले. तसेच त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. आता जखमींची प्रकृती स्थिर आहे.
या प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांनी रूची गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझे आणि माझे पती संदीप ठाकूर यांचे काही कारणांवरून मतभेद झाले आहेत. ते पूजेसाठी आले होते. तसेच त्यांनी अचानक गोळीबार केला. त्यांनी मला लक्ष्य करून गोळीबार केला होता की त्यांना दुसऱ्या कुणावर गोळ्या झाडायच्या होत्या, हे मला कळले नाही. मात्र पती-पत्नीमध्ये नेमक्या कुठल्या कारणावरून मतभेद आहेत, हे मात्र सांगण्यास रूची गुप्ता यांनी नकार दिला.