माणुसकीचे दर्शन! बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीला पोलीस अधिकाऱ्यानं घेतलं दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 02:12 PM2023-09-29T14:12:31+5:302023-09-29T14:12:53+5:30
मध्य प्रदेशातील उज्जैन येथे घडलेल्या घटनेने अवघ्या देशाच्या डोळ्यात पाणी आणलं.
Ujjain Minor Rape Case : मध्य प्रदेशातील उज्जैन येथे घडलेल्या घटनेने अवघ्या देशाच्या डोळ्यात पाणी आणलं. १५ वर्षीय चिमुकलीवर नराधमांनी अत्याचार केल्यानं संपूर्ण देश हादरला. एवढंच नाही तर आरोपींची क्रूरता एवढी की पीडित तरूणी ८ किलोमीटर नग्न अवस्थेत कपड्यांच्या शोधात फिरत राहिली. पण, दुर्दैव असं की कोणीच तिला आसरा दिला नाही. अखेर तिनं राहुल शर्मा नावाच्या पुजाऱ्याकडं मदत मागितली अन् तो पुजारी तिच्यासाठी देवदूत बनला. राहुल शर्मा हा उज्जैनपासून १५ किमी अंतरावर असलेल्या बडनगर आश्रमात असतो. त्याने तिला आसरा देऊन सर्व घटना पोलिसांच्या कानावर घातली. त्यामुळे पीडितेला मदत मिळाली आणि पोलिसांच्या प्रयत्नांनंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आलं.
दरम्यान, या प्रकरणी उज्जैन पोलिसांनी रिक्षा चालकासह पाच आरोपींना अटक केली आहे. उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. नग्न अवस्थेत फिरलेल्या पीडितेला आता अनेकजण मदत करत आहेत. अशातच महाकाल पोलीस ठाण्यातील अधिकारी अजय वर्मा यांनी माणुसकीचे दर्शन दाखवले. खरं तर त्यांनी पीडित मुलीला दत्तक घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच तिच्या शिक्षणाचा आणि संगोपनाचा संपूर्ण खर्च ते करणार आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
पीडितेसाठी पुजारी बनला 'देवदूत'
पीडित तरूणीवर अत्याचार करून नराधमांनी तिला अर्धनग्न रस्त्यावर सोडले. अंगावर काटा येणारं दृश्य पाहिल्यानंतर पुजारी राहुल शर्मानं म्हटलं, "मी मुलीला पाहताच लगेच कपडे देण्यासाठी सरसावलो. तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं. तिला बोलता देखील येत नव्हतं आणि डोळे सुजले होते. मग मी १०० नंबरवर फोन केला. हेल्पलाईन क्रमांकावरून पोलिसांशी संवाद न झाल्यानं महाकाल पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. २० मिनिटांत पोलीस आश्रमाजवळ पोहचले." खरं तर उज्जैनच्या रस्त्यावर तरूणी नग्न अवस्थेत फिरत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
पुजाऱ्याने सांगितली आपबीती
देवदूत पुजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी त्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण तिला बोलता देखील येत नव्हतं. त्याने तिला नाव विचारले, कुटुंबीयांबद्दल विचारले, तिला इथे सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. तो तिची माहिती विचारत होता परंतु ती खूप घाबरली होती. दरम्यान, कोणीही आले तरी ती खूप घाबरायची. पोलिसांना पाहून पीडितेच्या तोंडून शब्द देखील फुटत नव्हता.