तरुणाच्या हत्येनंतर पेट्रोल टाकून इमारतीत जाळला मृतदेह; आजूबाजूच्या लोकांमुळे उलघडलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 04:06 PM2024-12-09T16:06:17+5:302024-12-09T16:09:44+5:30
जबलपूरमध्ये एएका तरुणाची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या करुन त्याच्या मृतदेह जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jabalpur Crime :मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या करुन त्याच्या मृतदेह जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खाजगी प्रिंटिंग प्रेसच्या सुरक्षा रक्षकांवर तरुणाच्या हत्येचा आरोप आहे. तरुणाचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्यात आला आणि नंतर पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात प्रेसमध्येच आग लावण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
इमारतीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनी बिल्डिंगच्या शेजारी पान स्टॉल चालवणाऱ्या तरुणाची हत्या करून त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले होते. मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळल्याचाही आरोप सुरक्षा रक्षकांवर असल्याचे पोलिसांनी सांगितले. जेव्हा आरोपी मृतदेह जाळत होते तेव्हा आसपासच्या लोकांना इमारतीला आग लागल्याचे वाटले. स्थानिकांनी त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण केले. आरोपींना याची माहिती मिळताच त्यांनी प्रथम तेथून पळ काढला. मात्र नंतर त्यांनी स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून ही इमारत बंद होती, याच्या सुरक्षेसाठी बँकेने हेमराज सारिया आणि ग्यानसिंग ठाकूर यांना तैनात केले होते. इमारतीच्या शेजारी विकास पटेल हे पानाचे दुकान चालवत होते. अनेक महिन्यांपासून बिल्डिंगमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या हेमराज आणि ग्यानसिंग यांची विकास पटेल यांच्याशी ओळख झाली होती. हळूहळू मैत्री वाढली आणि सगळे मिळून दारू पिऊ लागले. काही दिवसांनी विकासचा ग्यानसिंग आणि हेमराज यांच्यासोबत वाद झाला. दोन चार दिवसांनी पुन्हा त्यांच्यात मारामारी झाली. काही दिवसांपूर्वी विकासचा सुरक्षा कर्मचाऱ्यांशी पुन्हा वाद झाला होता. त्यानंतर हेमराज आणि ग्यान सिंह यांनी त्यांची हत्या करण्याचा कट रचला होता.
रात्री तीन वाजण्याच्या सुमारास इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच पोलिसांनी इमारतीचे बंद शटर उघडले असता त्यांना मानवी शरीर जळत असल्याचे दिसले. आग विझवल्यानंतर पोलिसांनी उर्वरित अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी तपासणीसाठी पाठवून हत्येचा सविस्तर तपास सुरू केला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी आत्मसमर्पण करून पोलिसांना सांगितले की, आम्ही सर्वजण मिळून दारू प्यायचे. मात्र दारू पिऊन तो नेहमीच तो अपमान करायचा. त्यामुळे त्याने खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमराज आणि ग्यानसिंग यांनी नियोजन करुन विकासला इमारतीत नेले आणि डोक्यात लोखंडी रॉड आणि हातोड्याने वार करून त्याची हत्या केली. विकासची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी गेटला कुलूप लावून बाहेर पडले. मृतदेहाची विल्हेवाट लावता न आल्याने आरोपींनी मृतदेहावर पेट्रोल ओतून इमारतीच्या आतच त्याला पेटवून दिले. रात्री प्रिंटिंग प्रेसच्या इमारतीतून धूर निघत असल्याचे पाहून स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली होती.