काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या द केरला स्टोरी चित्रपटामुळे अनेक वादविवाद झाले आहेत. मात्र या चित्रपटाचं समर्थन करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. दरम्यान, हा चित्रपट पाहून आलेल्या एका हिंदू तरुणीनं तिच्या परधर्मीय प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. माझा प्रियकर माझ्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत आहे. तसेच धर्मांतर न केल्यास भाऊ आणि आईला मारण्याची धमकी देत आहे, असा आरोप या तरुणीने तक्रारीमधून केला आहे.
इंदूरमध्ये द केरला स्टोरी चित्रपट पाहिल्यानंतर एका तरुणीनं धर्मांतर करण्यापासून आपलं पाऊल मागे घेतलं. तसेच तिने धर्मांतरासाठी दबाव आणणाऱ्या तिच्या परधर्मीय प्रियकराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार एका तरुणासोबत तिची मैत्री झाली होती. सदर तरुणी कोचिंगसाठी जात असताना तिथे त्यांचा मैत्री झाली. त्यानंतर तिचं ब्रेनवॉश करण्यात आलं. त्यानंतर ती कुटुंबीयांपासून वेगळी राहू लागली. यादरम्यान, सदर तरुणाने तिच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच धर्मांतरासाठी मारहाणही केली, असा आरोप तिने केला.
दरम्यान, धर्मांतर न केल्यास तिच्या भावाला आणि आईला ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. दरम्यान, द केरला स्टोरी चित्रपट आला तेव्हा या तरुणीने हा चित्रपट पाहण्यासाठी या प्रियकराकडे आग्रह केला. मात्र त्याने त्यास नकार दिला. पुढे तो कसाबसा चित्रपट पाहायला तयार झाला. मात्र चित्रपट पाहून झाल्यावर या तरुणीने ही कहाणी तर माझ्यासारखीच आहे, असं त्याला सुनावलं. तसेच आपण धर्मांत करणार नसल्याचंही तिने बजावलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर तरुण आणि तरुणी काही काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, केरला स्टोरी चित्रपट पाहिल्यानंतर तरुणीने तक्रार दिली. त्या आधारावर या तरुणाविरोधात बलात्कार, धार्मिक स्वातंत्र्य अधिनियम, यासह अनेक गंभीर कलमांसह गुन्हा दाखल करून पोलिसांनी सदर तरुणाला अटक केली आहे. आरोपी तरुण हा १२वी नापास आहे. तर तरुणी उच्चशिक्षित असून, खासगी कंपनीत कामाला आहे. तिच्या पगारातूनच हा तरुण खर्चासाठी पैसे घेत असे.