शॉकींग! बलात्कारानंतर ती मदतीसाठी ८ किमी भटकत राहिली पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 10:17 AM2023-09-28T10:17:52+5:302023-09-28T10:18:41+5:30
आईसोबतही चुकीचे कृत्य झाले असा दावा ती करते; पण तिची आई कुठे आहे आणि ती उज्जैनला कशी पोहोचली
लोकमत न्यूज नेटवर्क
उज्जैन : एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी दांडी आश्रमाजवळ ही मुलगी अर्धवट कपड्यांमध्ये आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. तिचे कपडे रक्ताने माखले होते. ती सुमारे संवरखेडी सिंहस्थ बायपासच्या वसाहतींमध्ये अडीच तास भटकत राहिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती ८ किलोमीटर चालल्याने दिसत आहे.
आईसोबतही चुकीचे कृत्य झाले असा दावा ती करते; पण तिची आई कुठे आहे आणि ती उज्जैनला कशी पोहोचली, याबाबत तिला काही सांगता येत नाही. अतिरक्तस्रावामुळे मुलीला इंदूरच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी बलात्कार झाल्याला दुजोरा दिला आहे. तिच्या बोलण्यावरून मुलगी प्रयागराजची रहिवासी असावी, असा अंदाज पोलिस अधीक्षक सचिन शर्मा यांनी वर्तवला.
ऑटोचालक ताब्यात
सीसीटीव्ही फुटेजमध्ये हटकेश्वर रोडवर एक ऑटोरिक्षा दिसली, ज्यामध्ये पीडितेसोबत एक व्यक्तीही दिसत होती. फुटेजच्या मदतीने पोलिसांनी मंगळवारी रात्री ऑटोचालकाला ताब्यात घेतले आहे.
एसआयटीद्वारे तपास
या प्रकरणाची बालहक्क आयोगाने दखल घेतली असून पोक्सो कायद्यांतर्गत तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक शर्मा यांनी दिली.