भोपाळ - मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपाच्या वरिष्ठांनी धक्कातंत्र वापरलं. मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पायउतार व्हावं लागलं आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा मोहन यादव यांच्याकडे देण्यात आली. मोहन यादव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज मध्य प्रदेशात मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला. त्यामध्ये, केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचे निकटवर्तीय प्रद्युम्नसिंह तोमर यांनाही मंत्रीपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी विमानतळावरच ते ज्योतिरादित्य शिंदेंच्या पायावर डोकं ठेवल्याचं दिसून आलं.
मध्य प्रदेशात प्रद्युम्न तोमर हे ज्योतिरादित्य शिंदेंचे कट्टर समर्थक मानले जातात. राजधानी भोपाळमध्ये आज मोहन यादव यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. राजभवन येथील शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून आले होते, त्यावेळी राजा भोज विमानतळावर ज्योतिरादित्य शिंदेच्या स्वागताला त्यांच्या आमदारांनी व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी, शिंदेंना पुष्पगुच्छ भेट दिल्यानंतर प्रद्युम्नसिंह तोमर यांनी चक्क त्यांच्या पायावर डोकं ठेवल्याचं दिसून आलं. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदेंनी मंत्री तोमर यांचे हात हातात घेत गळाभेट केली. तसेच, तोमर यांना पुन्हा एकदा मंत्री झाल्याबद्दल अभिनंदनही केले. प्रद्युम्न तोमर हे शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रीमंडळात ऊर्जामंत्री होते. तर, २०१८ साली कमलनाथ यांच्या सरकारमध्येही मंत्री होते. मात्र, त्यांनी ज्योतिरादित्य शिंदेंसमवेत भाजपात प्रवेश केला. ग्वालियरचे महाराज ज्योतिरादित्य शिंदेंचे खंदे समर्थक म्हणून प्रद्युम्न तोमर यांची ओळख आहे. तोमर हे ग्वालियर विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले आहेत. यापूर्वी ते काँग्रेसच्या तिकीटावर येथून आमदार बनले होते. आता, भाजपाच्या कमळ चिन्हावर ते निवडून आले आहेत.