मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध खजराना गणेश मंदिरामध्ये सोमवारी सिंजारा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण उत्सवात सहभागी होण्यासाठी आणि बाप्पाची पूजा करण्यासाठी पोहोचले आहेत. मंदिराचे पूजारी अशोक भट्ट यांनी सांगितले की, या महोत्सवामध्ये भगवान खजराना गणेश, माता रिद्धी-सिद्धी आि शुभलाभ यांना सहपरिवार सुगंधित मेहंदी अर्पण केली जाणार आहे.
यादरम्यान, संपूर्ण मंदिरात उत्सवाचं वातावरण आहे. उत्सवाची सुरुवात सोमवारी सकाळपासून झाली आहे. यावेळी सकाळी ७ वाजता प्रसादाच्या रूपात भाविकांना सौभाग्यवर्धक मेहंदीचं वितरण करण्यात येईल. मंदिरातील मुख्य पूजाऱ्यांनी सांगितलं की, जी मेहंदी प्रसादाच्या रूपात दिली जाते, ती जर अविवाहित मुला-मुलींनी लावली तर त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच त्यांचा विवाह ठरतो.
मंदिराचे मुख्य पूजारी अशोक भट्ट यांनी सांगितले की, ही परंपरा खजराना गणेश मंदिरामध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी गणेश चतुर्थी दिवशी हरितालिकेदिवशी श्री खजराना गणेशाचे भक्त कांता वर्मा आणि भक्तांकडून सिंजारा उत्सवाचं आयोजन केलं जातं. तसेच सौभाग्य वर्धक मेहंदीही प्रसादाच्या रूपात वितरित केली जाते.