"माझे पालकांवर प्रेम आहे, पण...", वरिष्ठांनी टोमणे मारले म्हणून २७ वर्षीय डॉक्टरनं संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 04:41 PM2023-08-02T16:41:19+5:302023-08-02T16:41:39+5:30
मध्य प्रदेशातील भोपाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशातीलभोपाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ माजली. बाला सरस्वती या ज्युनिअर डॉक्टरने इंजेक्शनचा ओव्हरडोज घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी आता मृत डॉक्टरच्या पतीने गांधी मेडिकल कॉलेजच्या तीन डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. तीन वरिष्ठ डॉक्टरांनी माझ्या पत्नीला आळशी म्हणून टोमणे मारल्यामुळे तिने हे पाऊल उचलले असल्याचे मृत डॉक्टरच्या पतीने म्हटले आहे.
दरम्यान, बाला सरस्वतीने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहली. सुसाईड नोटमध्ये विभागातील तीन वरिष्ठ महिला डॉक्टरांना मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. सर्व काम मनापासून करूनही हलगर्जीपणाचे टोमणे मारले जात असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. "मला ज्युनिअर डॉक्टरांसमोर वरिष्ठ मंडळी आळशी आहेस असे म्हणतात. वेळेचे कोणतेही भान न ठेवता जास्त ड्युटी करायला भाग पाडले", असेही सुसाईट नोटमध्ये लिहले आहे. खरं तर ही सुसाईड नोट मृत महिला ज्युनिअर डॉक्टरने मोबाईलमध्ये लिहिली होती, तिने ही नोट तिच्या एका मैत्रिणीला व्हॉट्सॲपवरही पाठवली होती.
सुसाईट नोट लिहून संपवलं जीवन
तसेच डॉ. बाला सरस्वती हिने सुसाईड नोटच्या माध्यमातून पालकांची माफी मागितली. "माझे माझ्या पालकांवर खूप प्रेम आहे, पण मी नाईलाजास्तव हे पाऊल उचलत आहे, त्यामुळे मला माफ करा. तुम्ही लोकांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे. जय (पती) ही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भेट आहे. मी त्याच्यासोबत आनंदी आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहिले. पण मी माझे वचन मोडते याची लाज वाटते. हे कॉलेज मला जगण्यासाठी खूप वाईट आहे. हे लोक मला कधीच सुखाने राहू देणार नाहीत", असेही सुसाईड नोटमध्ये बाला सरस्वतीने म्हटले आहे.
विशेष बाब म्हणजे २७ वर्षीय बाला सरस्वती ही गांधी मेडिकल कॉलेजमध्ये स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. बाला सरस्वती हिने रविवारी रात्री भूल देण्याच्या इंजेक्शनचा ओव्हरडोज घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी बाला सरस्वती घरात बेशुद्धावस्थेत आढळून आली असता एकच खळबळ माजली.