मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बांदा येथील भाजपा आमदार वीरेंद्र सिंह लोधी यांच्या गाडीवर शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी गाडीच्या पुढील सीटवर आमदार वीरेंद्र सिंह लोधी बसले होते. त्यांना दुखापत झाली नाही. मात्र दगडफेकीत त्यांच्या गाडीची समोरील काच फुटली. ही घटना बरयठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करई गावाजवळ घडली.
आमदार वीरेंद्र सिंह लोधी आपल्या विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात आयोजित केलेल्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून परतत असताना ही घटना घडली आहे. या घटनेबाबत आमदार वीरेंद्र सिंह लोधी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यांनी शनिवारी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी दिल्याचे सांगितले.
रात्री लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. यानंतर परतत असताना सिलोट नदीच्या घाटावर अज्ञात व्यक्तीने चालत्या गाडीवर दगडफेक केली. समोरच्या सीटवर बसलेले असताना गाडीच्या पुढील काचेवर दगड पडल्याने काच फुटल्याचे आमदार वीरेंद्र सिंह लोधी यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच, आमदार वीरेंद्र सिंह लोधी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
दरम्यान, बांदा विधानसभा हा मतदारसंघ दमोह लोकसभा मतदारसंघात येतो. याठिकाणी 26 एप्रिल रोजी मतदान झाले होते. दमोहमधून भाजपाने दमोह विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले राहुल सिंह लोधी यांना तिकीट दिले होते. त्यांची लढत काँग्रेसचे तरवर सिंह लोधी यांच्याशी आहे. जनतेने त्यांचे भवितव्य ठरवले आहे. आता 4 जूनला निकाल लागणार आहे. 2019 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाचे प्रल्हाद सिंह पटेल विजयी झाले होते.