हज यात्रेसाठी सौदी अरेबियातील मक्का येथे गेलेल्या काँग्रेसच्या युवा नेत्याला तिथे भारत जोडो यात्रेचा पोस्टर झळकवून फोटो काढणं चांगलंच महागात पडलं. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या या युवा नेत्याला कायदा मोडल्याच्या आरोपाखाली १०० फटके देण्याची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला ८ महिने कारावासात काढावे लागले. दरम्यान, शिक्षा भोगून भारतात परत आल्यानंतर या नेत्याने तिथे आलेला भयावह अनुभव कथन केला आहे.
मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे युवा नेते रजा कादरी आठ महिन्यांनंतर घरी पोहोचले आहेत. हज यात्रेसाठी गेले असताना सौदी अरेबियातील पोलिसांनी त्यांना तुरुंगात टाकले होते. मक्का येथे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा पोस्टर दाखवला म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, सुटका करण्याच्या नावाखाली आपल्या कुटुंबीयांकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच काँग्रेसकडून सौदी अरेबियाच्या इंटेलिजन्स एजन्सीला अनेक मेल करण्यात आले मात्र त्याला प्रतिसाद देण्यात आला नाही. तसेच तुरुंगामध्ये छळ करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
रजा यांनी सांगितले की, मला दोन महिने ढाहबान येथील तुरुंगात बंद खोलीत ठेवण्यात आले. तिथे मला सकाळ-संध्याकाळ ब्रेडचे तुकडे दिले जायचे. पोलिसांनी लाय डिटेक्टरच्या माध्यमातून माझ्या जबाबाची पडताळणी केली. ते मला झोपू देत नसत. मी जवळपास दोन महिने सूर्याचा प्रकाश पाहिला नाही. नंतर मला शुमेसी डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. तेथील परिस्थिती अगदी वाईट होती. मला परत आणण्यामध्ये माझ्या कुटुंबीयांचे लाखो रुपये खर्च झाले. सौदीमध्ये माझ्यासारखे हजारो भारतीय अडकलेले आहेत. त्यांची अवस्था माझ्यापेक्षा वाईट आहे. यामधील अनेकांना त्यांच्याच एजंटनी फसवलं आहे.