Ujjain Mahakal Temple Wall Collapse: मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळला असला तरी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. शुक्रवारी सायंकाळी उज्जैनमध्ये मोठी दुर्घटना घडली. येथे महाकाल मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ बांधलेली भिंत चिखलामुळे कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शक्यता आहे.
माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य हाती घेतले. भिंत कोसळल्याने काही जण जखमीही झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेरिटेज वास्तू म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या महाकाल मंदिराजवळील महाराज वाडा शाळेची भिंत कोसळली.
मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्याने इंदूर-उज्जैन, जबलपूर आणि ग्वाल्हेर विभागात पावसाचा इशारा दिला आहे. IMD च्या मते, मध्य प्रदेशात आतापर्यंत सरासरी ४२.६ इंच पाऊस झाला आहे. वास्तविक, हवेच्या वरच्या भागात चक्रीवादळ तयार झाले असून, त्यामुळे उत्तर मध्य प्रदेशात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. अशा स्थितीत पुढील दोन-तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. विशेषत: इंदूर, उज्जैन, रेवा, ग्वाल्हेर आणि सागरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.