मध्य प्रदेशमध्ये बंडखोरांवर काँग्रेसची मोठी कारवाई, ३९ नेत्यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 11:14 PM2023-11-03T23:14:03+5:302023-11-03T23:14:37+5:30
Madhya Pradesh Assembly Election: मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता पंधरवडा उरला आहे. दरम्यान, राज्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी संपल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीत बंड करणाऱ्या नेत्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे.
मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता पंधरवडा उरला आहे. दरम्यान, राज्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी संपल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीत बंड करणाऱ्या नेत्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे. काँग्रेसचे बंडखोर आणि पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना पक्षातून बाहेरची वाट दाखवली आहे. काँग्रेसने निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या आणि शिस्तभंग करणाऱ्या तब्बल ३९ नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. यातील अनेक नेते हे बंडखोरी करून अपक्ष किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार प्रेमचंद गुड्डू यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवला आहे. गुड्डू हे रतलाम जिल्ह्यातील अलोट जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. राजीनामा देताना त्यांनी कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांनी सर्व तिकिटं आपल्या समर्थकांमध्येच वाटली आहेत. मी काँग्रेसच्या सर्व्हेमध्ये आघाडीवर होतो. मात्र असं असूनही माझं तिकीट कापलं गेलं, असा आरोप गुड्डू यांनी केला. प्रेमचंद गुड्डू हे अलोट येथे दीर्घकाळ सक्रिय आहेत. मात्र गुड्डू यांना उमेदवारी न देता आमदार मनोज चावला यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या गुड्डू यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.