मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमधील भाजपाचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासोबत भाजपामध्ये गेलेले त्यांचे निकटवर्तीय बैजनाथ यादव हे त्यांच्या समर्थकांसह पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसने शिंदे यांना टोला लगावला आहे. पुढे पुढे पाहा काय होतं ते. आता ज्योतिरादित्य शिंदे सोडून त्यांचे सर्व सहकारी पुन्हा काँग्रेसमध्ये परततील, असा दावा काँग्रेसने केला आहे.
२०१८ मध्ये १५ वर्षांच्या खंडानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये विजय मिळवण्यात यश मिळवलं होतं. अटीतटीच्या लढाईल काँग्रेसने भाजपावर मात केली होती. मात्र ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी पक्ष बदलल्याने काँग्रेसला सत्तेतून बाहेर जावं लागलं होतं. त्यामुळे आता काँग्रेसकडून ज्योतिरादित्य शिंदे यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच आज भोपाळमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंचे निकटवर्तीय असलेले बैजनाथ यादव, विनय यादव, नीरज सिंह, रामवीर यादव यांच्यासह त्यांचे अनेक समर्थक आणि नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला.
ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक काँग्रेसमध्ये येऊ लागल्याने मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. माजी मंत्री अरुण यादव यांनी या पक्षप्रवेशावरून शिंदे आणि भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपामध्ये पळापळ सुरू आहे. राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर अनेक नेते काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत. आता भाजपामध्ये एकटे ज्योतिरादित्य शिंदे राहतील. त्यांचे समर्थक असलेले आमदार, माजी आमदार आणि कार्यकर्ते ज्यांची भाजपामध्ये घुसमट होत आहे, ते योग्य वेळ येताच काँग्रेस पक्षात परतणार आहेत. पुढच्या काळात काँग्रेसमधून गेलेले अनेकजण पक्षात परतणार आहेत. त्याबरोबरच भाजपाचेही अनेक नेते काँग्रेसमध्ये येतील, असा दावाही अरुण यादव यांनी केला.