भोपाळ – मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी भाजपाने ३९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंतु या ३९ पैकी २ उमेदवारांची भलतीच चर्चा आहे. त्यातील एक मंडला जिल्ह्यातील बिछिया मतदारसंघातील उमेदवार आहेत डॉ. विजय आनंद मरावी, कारण गुरुवारी सकाळी जबलपूर मेडिकल कॉलेजच्या सहायक अधीक्षकपदाचा त्यांनी राजीनामा दिला होता. संध्याकाळी भाजपा उमेदवार यादीत त्यांचे नाव जाहीर झाले. त्याशिवाय बालाघाट जिल्ह्यातील लांजी मतदारसंघातील उमेदवार राजकुमार यांनी सकाळी आम आदमी पार्टीचा राजीनामा दिला आणि काही तासांत त्यांना भाजपाचा तिकीट जाहीर झाले.
तिकीट मिळण्याच्या काही क्षणापूर्वी सोडला होता पक्ष
गुरुवारी संध्याकाळी भाजपा उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यात बालाघाटच्या लांजी मतदारसंघात राजकुमार कर्राहे यांचे नाव पाहून प्रत्येक जण हैराण झाले. कारण भाजपा उमेदवार बनण्याच्या ४ तास अगोदर राजकुमार हे आम आदमी पक्षाचे नेते होते. इतकेच नाही तर परिसरात त्यांचे आपचे बॅनर लागले होते. त्यात पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही फोटो होता.
राजकुमार कर्राहे यांनी लांजी भागातील भाजपाचे युवा नेते म्हणून राजकारणाला सुरुवात केली, त्यानंतर ते २०१२ पर्यंत लांजी जनपद पंचायतीचे अध्यक्षही होते. २०१८ च्या निवडणुकीत राजकुमार यांच्यावर पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीचे सदस्यत्व घेतले. राजकुमार गेली ५ वर्षे आम आदमी पक्षाचा चेहरा म्हणून मैदानात सक्रिय प्रचारात होते.
सकाळी नोकरीचा राजीनामा, संध्याकाळी तिकीट मिळाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश
पहिल्या उमेदवार यादीत मंडला जिल्ह्यातील बिछिया विधानसभेतून भाजपने डॉ. विजय आनंद मारवी यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. विजय आनंद मारवी, मूळचे बिछियाचे रहिवासी आहेत, ते व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि ते जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत होते. भाजपाची यादी जाहीर होण्याच्या काही तास आधी गुरुवारीच डॉ.मरावी यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. एवढेच नाही तर तिकीट मिळाल्यानंतरच त्यांनी भाजपचे सदस्यत्वही घेतले. भाजपचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर डॉ.विजय आनंद मरावी यांनी गुरुवारी सायंकाळी भाजप जिल्हा कार्यालयात पोहोचून सदस्यत्वाचा अर्ज भरला आणि पक्षात प्रवेश केला.
२०१८ मध्ये मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांपैकी भाजपाने १०९ जागा जिंकल्या, तर कॉंग्रेसच्या ११४ जागा होत्या. कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने राज्यात सरकार स्थापन केले. पण २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडाने १५ महिन्यांचे काँग्रेस सरकार पडले. शिंदे गटातील २२ काँग्रेस आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आणि शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. सध्या मध्यप्रदेशात भाजपच्या आमदारांची संख्या १२७ आहे.