भाजपाची मोठी खेळी! मुख्यमंत्रीपद नाकारलेल्या शिवराजसिंह चौहान यांना लोकसभेचं तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 07:30 PM2024-03-02T19:30:04+5:302024-03-02T19:36:38+5:30
BJP first List for Lok Sabha Elections 2024: सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. उमेदवारांची चाचपणी सुरू असताना भाजपाने पहिली यादी जाहीर करून १९५ उमेदवारांची नावं उघड केली आहेत. दिल्लीत झालेल्या भाजपाच्या निवडणूक समितीच्या बैठकीनंतर शनिवारी १९५ जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून लढणार आहेत यावर शिक्कामोर्तब झाले. १९५ उमेदवारांपैकी ३४ उमेदवार हे विद्यमान केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याही नावाचा समावेश आहे. याशिवाय दोन माजी मुख्यमंत्री, २८ महिला आणि ५० पेक्षा कमी वयाचे युवा ४७ उमेदवार असतील, अशी माहिती विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना देखील लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी जनार्दन मिश्रा यांना रीवा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा तिकीट मिळाले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर शिवराज सिंह चौहान पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील असे बोलले जात असताना त्यांना वगळून मोहन यादव यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यामुळे आता शिवराज सिंह यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
कोणत्या राज्यातील किती नावे?
भाजपाच्या १९५ जणांच्या यादीत उत्तर प्रदेशातील ५१, पश्चिम बंगालमधील २०, मध्य प्रदेशातील २४, गुजरात आणि राजस्थानमधील प्रत्येकी १५, केरळमधील १२, तेलंगणातील ९, आसाममधील ११, झारखंड आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी ११, दिल्लीतून ५, जम्मू-काश्मीरमधून २, उत्तराखंडमधून ३, अरुणाचल प्रदेशमधून २ आणि गोवा, त्रिपुरा, अंदमान व निकोबार आणि दमण आणि दीवमधून प्रत्येकी एकाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपाचे बडे नेते आणि त्यांचे मतदारसंघ
पंतप्रधान नरेंद्र मोदी - वाराणसी
अमित शाह - गांधीनगर (गुजरात)
शिवराज सिंह चौहान - विदिशा (मध्य प्रदेश)
स्मृती इराणी - अमेठी (उत्तर प्रदेश)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह - लखनौ (उत्तर प्रदेश)
बन्सुरी स्वराज (सुषमा स्वराज यांच्या कन्या) - नवी दिल्ली
हेमा मालिनी - मथुरा (उत्तर प्रदेश)
आरोग्यमंत्री मनसुख मांडविय - पोरबंदरमधून (गुजरात)
विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया - गुना (मध्य प्रदेश)
किरन रिजिजू, तापीर गाओ - अरुणाचल प्रदेश
पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव - अलवर (राजस्थान)
केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन - अटिंगल
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर - तिरुअनंतपुरम
कमलजीत सेहरावत - पश्चिम दिल्ली
रामवीर सिंग बिधुरी - दक्षिण दिल्ली
प्रवीण खंडेलवाल - चांदनी चौक (दिल्ली)
मनोज तिवारी - ईशान्य दिल्ली
माजी मुख्यमंत्री बिप्लब देब - त्रिपुरा
आसामचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे जहाज वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल- दिब्रुगड