इंदूर : यावर्षीच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीचे वारे आतापासून राज्यात वाहू लागले आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नसला तरी पक्ष आणि उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणूक पक्ष आणि त्यांचे नेते रॅली आणि जाहीर सभा घेत आहेत. निवडणुकीतील अनेक आश्वासने दिली जात आहेत.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर-१ मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ते आपल्या मतदारसंघात फिरून मतदारांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान, एका जनसभेला संबोधित करताना कैलाश विजयवर्गीय यांनी असे काही विधान केले आहे, ज्यावर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. यासंबंधीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, "भाजपला आशीर्वाद द्या. काँग्रेसला एक मतही देऊ नये. ज्या वॉर्डातून काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, त्या बूथ अध्यक्षाला ५१ हजार रुपये दिले जातील."
याआधी कैलाश विजयवर्गीय यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते तिकीट मिळाल्याने खूश नसल्याचे सांगत होते. कैलाश विजयवर्गीय म्हणाले होते की, "मला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, एक टक्काही इच्छा नाही. पू्र्वी लढा देण्याची एक मानसिकता असते. आपल्याला काही तरी मिळवायचे आहे, भाषणं द्यायची आहेत, पण आता आपण मोठे नेते झालो आहोत, मग हात जोडायला कुठे जाणार, भाषण द्या आणि निघा…हाच विचार आम्ही केला होता. नियोजित योजना अशीच होती की दररोज ८ सभा घ्यायच्या आहेत. ५ हेलिकॉप्टरने आणि ३ कारने, अशा प्रकारे या संपूर्ण निवडणुकीत ८ बैठका घ्यायच्या आहेत आणि हे सर्व नियोजन देखील करण्यात आले होते. त्यामुळे आता काही गोष्टी कराव्या लागतील."
दरम्यान, कैलाश विजयवर्गीय यांना तिकीट मिळणे हा चर्चेचा विषय बनला आहे. तिकीट मिळाल्यानंतर त्यांचा मुलगा इंदूर-३ चे आमदार आकाश विजयवर्गीय यांचे तिकीट रद्द होऊ शकते, असे म्हटले जात आहे. दरम्यान, आपल्या निवडणुकीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित असताना आकाश विजयवर्गीय यांनी भाजपच्या प्रत्येक आदेशाचे पालन करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, काँग्रेसच्या ताब्यातील इंदूर-१ या जागेवर वडील कैलाश विजयवर्गीय किमान एक लाख मतांनी निवडणूक जिंकतील, असा दावा सुद्धा आकाश विजयवर्गीय यांनी केला आहे.