BJP Kailash Vijayvargiya: मध्य प्रदेश विधासभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या योजना आखण्यास खूप आधीच सुरूवात केली होती. त्यात आता काही अंशी बदल करण्यात येत आहेत. यंदाच्या निवडणुकांसाठी भाजपाने ज्येष्ठ व वरिष्ठ नेत्यांना प्रचाराच्या रिंगणात उतरवले आहे. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे कैलाश विजयवर्गीय. मंगळवारी संध्याकाळी कैलाश विजयवर्गीय यांनी विधानसभा क्षेत्रात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित केले. या वेळी बोलताना त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे सांगितले.
पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले, “इथले कार्यकर्ते या विधानसभा मतदारसंघाला विकासात नंबर 1 बनवतील. मी तुम्हाला आश्वासन देतो, मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी येईन, मला जमेल तेवढ्या जणांना भेट देण्याचा प्रयत्न करेन, मला जाता येत नसेल, तर इंदूर-१ विधानसभा मतदारसंघाचा एक घरही सोडू नये ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही स्वतः कैलाश विजयवर्गीय बनून लोकांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या आणि येथे विक्रमी विजय मिळावा, हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे," असे विजयवर्गीय म्हणाले.
'आता मी मोठा नेता'
“मला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, एक टक्काही इच्छा नाही. पू्र्वी लढा देण्याची एक मानसिकता असते. आपल्याला काही तरी मिळवायचे आहे, भाषणं द्यायची आहेत, पण आता आपण मोठे नेते झालो आहोत, मग हात जोडायला कुठे जाणार, भाषण द्या आणि निघा… भाषण द्या आणि निघा हाच विचार आम्ही केला होता. नियोजित योजना अशीच होती की दररोज ८ सभा घ्यायच्या आहेत. 5 हेलिकॉप्टरने आणि 3 कारने, अशा प्रकारे या संपूर्ण निवडणुकीत ८ बैठका घ्यायच्या आहेत आणि हे सर्व नियोजन देखील करण्यात आले होते. त्यामुळे आता काही गोष्टी कराव्या लागतील," असेही विजयवर्गीय म्हणाले.