मध्य प्रदेशात भाजपा नेत्याची हत्या, इंदूरमध्ये भगवा यात्रेची तयारी करत असताना झाला गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 01:14 PM2024-06-23T13:14:02+5:302024-06-23T13:15:13+5:30

BJP leader Monu Kalyane shot dead in Indore: मध्य प्रदेशमधील इंदूर येथे भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोनू कल्याणे हे मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय होते.

BJP leader Monu Kalyane shot dead in Indore | मध्य प्रदेशात भाजपा नेत्याची हत्या, इंदूरमध्ये भगवा यात्रेची तयारी करत असताना झाला गोळीबार

मध्य प्रदेशात भाजपा नेत्याची हत्या, इंदूरमध्ये भगवा यात्रेची तयारी करत असताना झाला गोळीबार

मध्य प्रदेशमधील इंदूर येथे भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोनू कल्याणे हे मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय होते. जुन्या वादामधून पीयूष आणि अर्जुन यांना मोनू कल्याणे याच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोघ घेत आहेत. 

इंदूरमधील विधानसभा क्रमांक ३ च्या राजकारणामध्ये बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या मोनू कल्याणे यांना कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आणि माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय मानले जात असे. गोळी लागल्यानंतर मोनू कल्याणे यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात आणले. मात्र तिथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मोनू कल्याणे हे इंदूरमध्ये भगवा यात्रेची तयारी करत होते. त्याचदरम्यान पीयूष आणि अर्जुन नावाचे दोन तरुण दुचाकीवरून चिमणबाग येथे आले. त्यांनी दुचाकीवरूनच मोनू यांच्याशी चर्चा केली. त्याचदरम्यान, दुचाकीवर मागे बसलेल्या अर्जुन याने पिस्तूल काढत मोनूवर धडाधड गोळ्या झाडल्या. त्यानंतर हे दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. 
आरोपींनी चिमणाबाग येथील चौकात उभ्या असलेल्या मोनूच्या मित्रांवरही गोळीबार केला, मात्र सुदैवाने ते बचावले. दरम्यान, हत्येच्या घटनेनंतर कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आकाश वियवर्गीय यांनी आपल्या समर्थकांसह मोनू यांच्या घरी धाव घेत त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे मध्य प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. 

Web Title: BJP leader Monu Kalyane shot dead in Indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.