"डिग्री मिळवून काहीही होणार नाही, पंक्चरचे दुकान उघडा", भाजप आमदाराचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 09:25 PM2024-07-15T21:25:43+5:302024-07-15T21:26:24+5:30
BJP MLA Pannalal Shakya : गुना मतदारसंघातील 'पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्स'च्या उद्घाटनासाठी आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना आमदारांनी हा सल्ला दिला.
मध्य प्रदेशातील भाजप आमदार पन्नालाल शाक्य यांनी विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला दिला आहे. डिग्री मिळवून काहीही होणार नाही, मोटारसायकल पंक्चरचे दुकान उघडा, असा सल्ला आमदार पन्नालाल शाक्य यांनी विद्यार्थ्यांना दिला. विशेष म्हणजे, गुना मतदारसंघातील 'पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्स'च्या उद्घाटनासाठी आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना आमदारांनी हा सल्ला दिला. त्यामुळे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी इंदूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राज्यातील ५५ जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन माध्यमातून 'पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्स'चे उद्घाटन केले. यानिमित्ताने गुनासह संबंधित जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुना येथे आयोजित कार्यक्रमात आमदार पन्नालाल शाक्य म्हणाले, "आम्ही आज पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन करत आहोत. मी सर्वांना आवाहन करतो की, महाविद्यालयातील डिग्रीमुळे काही होणार नाही, हे एक वाक्य ध्यानात ठेवा. त्याऐवजी किमान उदरनिर्वाहासाठी मोटारसायकल पंक्चर दुरुस्तीचे दुकान उघडा."
याचबरोबर, इंदूरमध्ये रविवारी आयोजित केलेल्या मोठ्या वृक्षारोपण मोहिमेचा स्पष्ट संदर्भ देत आमदार पन्नालाल शाक्य म्हणाले, "लोक झाडे लावत आहेत. मात्र झाडांना पाणी देण्यास ते स्वारस्य दाखवत नाहीत." दरम्यान, मोहिमेअंतर्गत इंदूर शहरात २४ तासांत ११ लाखांहून अधिक रोपे लावण्यात आली, हा एक नवा जागतिक विक्रम आहे.
आमदार पन्नालाल शाक्य म्हणाले की, सर्वप्रथम मानवी शरीर बनवणाऱ्या पंचतत्त्वांचे (पृथ्वी, हवा, पाणी, सौर ऊर्जा आणि आकाश) जतन केले पाहिजे. नद्या आणि नाल्यांच्या काठावरील सरकारी जमिनींवर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधून आमदार पन्नालाल शाक्य म्हणाले, प्रदूषण आणि पर्यावरणाची चिंता आहे, परंतु या दिशेने (पंचतत्व वाचवण्यासाठी) कोणीही काम करत नाही. आज लावलेल्या रोपांची आपण किती काळ काळजी घेणार आहोत? असा सवालही त्यांनी केला.