मध्य प्रदेशात आदिवासी तरुणावर भाजप आमदाराच्या मुलाचा गोळीबार, आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 01:50 PM2023-08-04T13:50:17+5:302023-08-04T13:50:51+5:30
काही दिवसांपूर्वी आदिवासी व्यक्तीवर भाजप कार्यकर्त्याने लघुशंका केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता गोळीबाराची घटना समोर आली.
काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशात एका आदिवासी व्यक्तीच्या अंगावर भाजपच्या कार्यकर्त्याने लघुशंका केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. सिंगरौली येथे एका आदिवासी तरुणावर गोळीबाराची घटना घडली आहे. सिंगरौलीचे भाजप आमदार रामलल्लू वैश यांचा मुलगा विवेक वैश याने त्या तरुणावर हा जीवघेणा हल्ला केला. सध्या पीडित आदिवासी तरुण धोक्याबाहेर आहे, मात्र आरोपी विवेक वैश फरार असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
जखमी तरुणाची प्रकृती स्थिर
हे प्रकरण सिंगरौली जिल्ह्यातील मोरबा येथील आहे. सिंगरौलीचे भाजप आमदार रामलल्लू वैश यांचा मुलगा विवेक वैश याने किरकोळ वादातून आदिवासी तरुण सूर्या खैरवारवर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने सूर्या खैरवार याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता बुढी माई मंदिराजवळ घडली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ रुग्णालय गाठले.
घटनेला चार तास उलटूनही पोलिस एफआयआर लिहिण्यास टाळाटाळ करत होते. याउलट आरोपीचे नाव न सांगण्याचा पीडत तरुणावर दबाव टाकला. यानंतर या गंभीर घटनेबाबत स्थानिकांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणल्यानंतर पोलिसांनी कलम 307, 25 कलम लावले आणि आमदार मुलावर गुन्हा दाखल केला.
काँग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीका
भाजप आमदार रामलल्लू वैशचा मुलगा विवेक याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही त्याच्यावर वन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विचारले की, या घटनेतील पीडितेचेही पाय धुणार का? आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवणार का? सिधी येथील आदिवासीच्या अंगावर लघवी केल्याप्रकरणी आरोपीच्या घरावर बुलडोझर चढवण्यात आला होता.