मिझोराम वगळता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळाच्या ११.४५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे.
मध्य प्रदेशात भाजपला पुन्हा एकदा मोठे बहुमत मिळत आहे. त्याचवेळी राजस्थानमध्येही भाजपा पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. छत्तीसगडमध्येही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपची कामगिरी चांगली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे भाजपाच्या एका रणनितीची चर्चा सध्या रंगू लागली आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने काही महिन्यांपूर्वी निवडणुकीसाठी तिकीट वाटप केले होते, मात्र कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. पंरतु २०१८मध्ये भाजपाने मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. परिणामी तिन्ही राज्यात भाजपाचा पराभव झाला. मात्र यावेळी भाजपने तसे केले नाही. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करणं टाळलं. भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने निवडणूक लढवली आणि त्याचा मोठा परिणामही दिसून येत आहे.