शाहजहानने आपल्या पत्नीच्या आठवणीत ताजमहाल बांधला होता. हा ताजमहाल आज 'प्रेमाचे प्रतिक' म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. आजच्या काळात आपल्या पत्नीसाठी कोण असं काय करेल का? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. पण मध्य प्रदेशातील छतरपुर येथे असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. कारण येथील निवृत्त शिक्षकाने आपल्या पत्नीच्या आठवणीत तब्बल १.५ कोटीचं मंदिर बांधलं आहे. पत्नीच्या आठवणीतील 'राधा कृष्ण'चं हे मंदिर सर्वांचे लक्ष वेधत आहे.
बीपी चंसोरिया (BP Chansoria) या निवृत्त शिक्षकाने हे मंदिर बांधले आहे. ज्या दिवशी चंसोरिया यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हाच त्यांनी संकल्प केला की, पत्नीच्या आठवणीत भव्यदिव्य मंदिर बांधांयचं. मंदिराचे काम राजस्थानातील अनेक मुस्लिम शिल्पकारांनी मिळून केले आहे. ३ वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर मंदिरावर संगमरवरी फरशी बसवण्यात यश आले.
१.५ कोटीचं मंदिर वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बीपी चंसोरिया यांनी या मंदिराबद्दल म्हटले, "माझ्या पत्नीचा नोव्हेंबर २०१६ मध्ये मृत्यू झाला होता. तेव्हाच मी मंदिर उभारण्याचा संकल्प केला होता. यासाठी सहा वर्षे आणि सात दिवस लागले असून १.५ कोटी खर्च झाला आहे. राधा कृष्ण प्रेमाचे प्रतिक आहेत, त्यांना लोक पिढ्यानपिढ्या आठवणीत ठेवतील."
२९ मे पासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार मंदिर हे मंदिर २९ मे पासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार असल्याचे चंसोरिया यांनी सांगितले. "मी तरूणांना हे सांगू इच्छितो की, लग्नानंतर प्रेमच सर्वकाही असते. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टीसाठी आपल्या प्रेमाला किंवा पत्नीची साथ सोडू नका."