ब्रिटिशकालीन सोन्याची नाणी, कोट्यवधींमध्ये किंमत, पोलिसांवरच चोरीचा आळ, असं फुटलं बिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 12:49 PM2023-07-24T12:49:08+5:302023-07-24T12:49:48+5:30
Madhya Pradesh News: सोंडवा पोलीस ठाण्यातील प्रभारी आणि त्यांच्या तीन अन्य पोलीस सहकाऱ्यांवर सोन्याची २४० नाणी चोरल्याचा आरोप झाला आहे. यातील प्रत्येक सोन्याच्या नाण्याचं वजन सुमारे ७.९८ ग्रॅम असून, त्याची भारतीय बाजारातील किंमत ४४ हजार तर आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ही तब्बल ३ लाख रुपये एवढी आहे.
मध्य प्रदेशमधील अलिराजपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील सोंडवा पोलीस ठाण्यातील प्रभारी आणि त्यांच्या तीन अन्य पोलीस सहकाऱ्यांवर सोन्याची २४० नाणी चोरल्याचा आरोप झाला आहे. यातील प्रत्येक सोन्याच्या नाण्याचं वजन सुमारे ७.९८ ग्रॅम असून, त्याची भारतीय बाजारातील किंमत ४४ हजार तर आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ही तब्बल ३ लाख रुपये एवढी आहे. याचाच अर्थ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जी नाणी चोरल्याचा आरोप झाला आहे. त्याची किंमत ७ कोटी रुपयांहून अधिक आहे. ही बाब समोर आल्यानंतर आरोपींसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
एका आदिवासी कुटुंबाला मारहाण करून त्यांच्या घरातून सोन्याची २४० नाणी चोरल्याचा आरोप या चार पोलिसांवर असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अलिराजपूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक हंसराज सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी चारही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामध्ये सोंडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि तीन कॉन्स्टेबलचा समावेश आहे.
दरम्यान, गरीब आदिवासी कुटुंबाकडे सोन्याची एवढी नाणी आली कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत पोलिसांनी सांगितले की, तक्रारकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांना गुजरातमध्ये मजुरी करण्यासाठी गेले असताना खोदकाम करताना ही सोन्याची नाणी सापडली होती. तिथून परतल्यावर मजुरांनी ही नाणी वाटून घेत जमिनीखाली लपवली होती.
दरम्यान, बैजदा गावातील रहिवासी असलेल्या शंभू सिंह यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती. १९ जुलै रोजी सकाळी सोंडवा पोलीस ठाण्यातील चार पोलीस त्यांच्या घरी आले. त्यांनी घरात असलेली त्यांची पत्नी रमकुबाई हिला मारहाण केली. तसेच घरात ठेवलेली सोन्याची २४० नाणी घेऊन ते निघून गेले. असे शंभू सिंह यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही सोन्याची नाणी ब्रिटिशकालीन आहेत. त्यावर जॉर्ज ५ असं कोरलेलं आहे. हे नाणं १९२२ रोजी ब्रिटिशांनी आणलं होतं. भारतीय बाजारात या नाण्यांची किंमत दीड कोटी रुपये, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ७ कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती समोर येत आहे.