उज्जैन : लसणाच्या वाढत्या किमती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. दरम्यान, शेतातून लसूण चोरीला गेल्याची घटनाही समोर आली आहे. उज्जैनच्या कलालिया गावात लसूण चोरी झाल्याचे समोर आले होते. यानंतर लसूण चोरीला जाण्याच्या भीतीमुळे मंगरोळा गावातील शेतकऱ्यांनी बंदूक घेऊन शेतात पहारा देण्यास सुरुवात केली आहे. तसेच, काही शेतकऱ्यांनी शेतात सीसीटीव्ही लावले आहेत, जेणेकरून पिकांवर 24 तास नजर ठेवता येईल.
नुकतेच उज्जैनच्या खाचरोड तहसील भागातील कलालिया गावात शेतकरी संजय शहा यांच्या शेतातून लसूण चोरी झाल्याचे समोर आले होते. संजय शहा सकाळी शेतात पोहोचले असता त्यांना ही बाब समजली. याशिवाय, इतर शेतातून लसूण चोरीची प्रकरणे उघडकीस येऊ लागली. यानंतर उज्जैनच्या मंगरोला गावातील शेतकरी जीवन सिंह आणि भरत सिंह यांनी चोरीच्या भीतीने आपल्या शेतात सीसीटीव्ही लावले आहेत. तसेच, शेतात पहारा देण्यासाठी कुत्रे आणि चौकीदार तैनात केले आहेत. याशिवाय ते स्वत: बंदुकीसह शेतात लसणाची रखवाली करताना दिसून येतात.
दरम्यान, बियाण्यांचे चढे भाव आणि हवामानामुळे उत्पादनात घट होत आहे, त्यामुळे लसणाची आवक कमी होऊन भाव वाढू लागले आहेत, असे शेतकरी जीवन सिंह सांगतात. बाजारात ओला लसूण 15 हजार रुपये प्रतिक्विंटल तर सुका लसूण 40 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. उज्जैनमध्ये 1000 हेक्टर क्षेत्रात लसणाची लागवड केली जाते, ज्यामध्ये बडनगर, नागदा, खाचरोड, घाटिया या तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. गतवर्षी 12 ते 14 हजार रुपये भाव होता, आता या वेळी 4 पट भाव आहे.