शाजापूर : जनतेच्या उदंड पाठिंब्यामुळे मध्य प्रदेशात भाजपचा झंझावात सुरू आहे. जनता काँग्रेसला राज्यातून उखडून टाकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ते मध्य प्रदेशातील शाजापूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करत होते.
देशाने दोन दिवसांपूर्वी दिवाळी साजरी केली होती आणि आता ३ डिसेंबर रोजी दुसरी दिवाळी साजरी केली जाईल. त्या दिवशी मध्य प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होईल, असेही ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, 'राज्यात सध्या जो झंझावात सुरू आहे... तो भाजपचा आहे. हे वादळ राज्यातील काँग्रेसचा तंबू उखडून टाकेल. जगभरातील विकासासाठी भारताचे कौतुक होत आहे. आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे. पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात मी देशाच्या अर्थव्यवस्थेला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये नेईन.'
हा पक्ष जिथे सत्तेवर येतो, तिथे भ्रष्टाचार करतो आणि देशात फक्त एकाच कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करतो. काँग्रेसचा एकमेव अजेंडा लोकांना लुटणे असाच आहे. पक्ष नकारात्मकतेवर केंद्रित आहे. नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पंतप्रधान म्हणाले की, हिंदीमध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत मोदी म्हणाले की, गरीब लोकांनी डॉक्टर आणि इंजिनिअर व्हावे, असे काँग्रेसला कधीच वाटत नव्हते. म्हणूनच भाजप सरकारने हे अभ्यासक्रम हिंदीतून सुरु केले, पण त्याचा (काँग्रेस) विरोधही करत आहे.
राहुल गांधींना टोला लगावत मोदी म्हणाले १ की, "काँग्रेसचे एक महाज्ञानी आजकाल मध्य प्रदेशात फिरत आहेत. महाज्ञानीसारख्यांच्या विचारसरणीने देश उद्ध्वस्त केला आहे. जिथे जिथे काँग्रेस आली, तिथे विनाश झाला. काँग्रेस शेतकरी, तरुण आणि महिलांची शत्रू आहे. ती जे काही करते, ते एका कुटुंबाच्या नावावर करते. काँग्रेसला तुमच्या कुटुंबाची पर्वा नाही. काँग्रेसकडे तुम्हाला देण्यासाठी फक्त निराशा, विरोध आणि नकारात्मकता आहे. काँग्रेस स्वभावानेच दंगल आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देते. देशातील कोणतीही व्यक्ती काँग्रेसचे कारनामे विसरु शकत नाही. भाजपाने मध्य प्रदेशला अतिशय खोल विहिरीतून बाहेर काढलं आहे."