मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ब्लूटूथ स्पीकरच्या बॅटरीचा स्फोट होऊन एक मुलगा जखमी झाला आहे. हे एवढं भीषण होतं की या बॅटरीचा स्फोट झाल्याने 13 वर्षीय मुलाच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. स्फोटात मुलाचा चेहरा देखील भाजला आहे. अपघातानंतर मुलाला गंभीर अवस्थेत तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा 13 वर्षांचा मुलगा ब्लूटूथ स्पीकरवर गाणी ऐकत होता. त्याचवेळी स्पीकरमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला. मोठा आवाज येताच कुटुंबीय घाबरले. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा खजुराहोच्या लाल पूरवा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे.
13 वर्षीय निष्पाप देवेंद्र कुशवाह खोलीत ब्लूटूथ स्पीकरवर गाणे ऐकत होता. तेव्हा अचानक खोलीत स्फोट झाल्याचा आवाज आला. या स्फोटात देवेंद्र गंभीररित्या भाजला असून त्याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा चेहराही भाजला आहे. घरच्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं.
कुटुंबीयांनी देवेंद्रला उपचारासाठी राजनगरच्या रुग्णालयात नेलं. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला छतरपूरच्या जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं. जिल्हा रुग्णालयात आता देवेंद्रवर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असली तरी तो सध्या बोलण्याच्या अवस्थेत नाही. त्याला मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.