छिंदवाडा - मध्य प्रदेशातील बहुचर्चित छिंदवाडा लोकसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथी थांबण्याची चिन्हे नाहीत. छिंदवाडा महानगरपालिकेचे महापौर विक्रम अहाके यांनी पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला. विक्रम अहाके यांनी यु-टर्न घेत काँग्रेसमध्ये परतले आहेत. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ जारी करून कमलनाथ, नकुलनाथ यांचं कौतुक करत काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केले आहे.
विक्रम अहाके यांनी व्हिडिओ शेअर करत मध्य प्रदेश काँग्रेसनं म्हटलंय की, छिंदवाडा येथे भाजपाला जबर धक्का बसला आहे. काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश घेतलेले महापौर विक्रम अहाके पुन्हा एकदा काँग्रेस नेते कमलनाथ आणि नकुलनाथ यांच्यासोबत आलेत. विक्रम यांनी जनतेला काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केले आहे.
१ एप्रिल रोजी छिंदवाडा महानगरपालिकेचे महापौर विक्रम अहाके राजधानी भोपाळमध्ये पोहोचले आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी कमलनाथ यांचे निकटवर्तीय विक्रम यांना पक्षाचे सदस्यत्व दिले होते. मात्र आता विक्रम यांनी मी पक्ष सोडल्याची खंत माझ्या मनात होती. काहीतरी चूक करतोय असं मनाला वाटत होते. ज्यांनी छिंदवाडाचा विकास केला, नेहमी जनतेसोबत राहिले असं असताना कमलनाथ यांची साथ सोडणं मला दुखद वाटले, म्हणून मी पुन्हा काँग्रेसमध्ये आलो आहे असं त्यांनी सांगितले.
यावेळी छिंदवाडा महानगरपालिकेच्या जलविभागाचे सभापती प्रमोद शर्मा यांच्यासह महापौर विक्रम आहाके, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धांत थानेसर, माजी एनएसयूआय जिल्हाध्यक्ष आशिष साहू, माजी एनएसयूआय जिल्हा उपाध्यक्ष धीरज राऊत, माजी एनएसयूआय जिल्हा कार्याध्यक्ष आदित्य उपाध्याय, एनएसयूआयचे माजी विधानसभा अध्यक्ष सुमित दुबे आदी उपस्थित होते. भाजपमध्येही प्रवेश केला होता.
दरम्यान, मध्य प्रदेशातील लोकसभेच्या २९ जागांपैकी भाजपाकडे २८ जागा आहेत तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याकडे एकमेव छिंदवाडा जागा आहे. कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ हे पुन्हा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीला उभे आहेत. तर भाजपाने विवेक बंटी साहू यांना उमेदवारी दिली आहे.