बजरंगबलीच्या वेषातील व्यक्तीला क्रेनवर लटकवून मुख्यमंत्र्यांचं स्वागत; काँग्रेसचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 13:37 IST2023-12-18T13:09:58+5:302023-12-18T13:37:04+5:30
मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे उज्जैन नगरीत स्वागत करताना चक्क हनुमानाच्या वेशातील व्यक्तीने त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातला.

बजरंगबलीच्या वेषातील व्यक्तीला क्रेनवर लटकवून मुख्यमंत्र्यांचं स्वागत; काँग्रेसचा संताप
भोपाळ - मध्य प्रदेशचे काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या बालेकिल्ल्यातील छिंदवाडा येथे हनुमान लोक कॉरिडोअरचे भूमीपूजन माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले होते. त्यामुळे, मध्य प्रदेशच्या राजकारणात निवडणुकांमध्ये हनुमान हा मुद्दा चांगलाच गाजला होता. भाजपा नेत्यांनी आणि समर्थकांनी हनुमान चालिसा व हनुमाना लोकच्या मुद्द्यावरुन हिंदू मतांना आकर्षित करण्याची भूमिका घेतल्याचं दिसून आलं. तर, काँग्रेसनेही हनुमान लोक कमलनाथ यांच्याच कालावधीत झाल्याचं म्हटलं आहे. आता, भाजपा समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या केलेल्या स्वागतावरुन काँग्रेसने भाजपला लक्ष्य केलं आहे.
मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे उज्जैन नगरीत स्वागत करताना चक्क हनुमानाच्या वेशातील व्यक्तीने त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातला. एका बड्या क्रेनवर हनुमानाच्या वेशातील व्यक्ती क्रेनवर लटकल्याचं या व्हिडिओत दिसून येत आहे. तसेच, क्रेनच्या सहाय्याने बजरंगबलीच्या वेशातील ती व्यक्ती मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या गळ्यात पुष्पहार घालते. त्यानंतर, मुख्यमंत्रीही त्या व्यक्तीच्या म्हणजेच हनुमानाच्या गळ्यात पुष्पहार घालत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून काँग्रेसने या व्हिडिओवरुन भाजपाला टोला लगावत प्रश्न विचारला आहे.
बजरंग बली को क्रेन पर लटका कर और उनके हाथों से मध्यप्रदेश के मुख्यमंत्री का स्वागत करवाने पर ढोंगियों का खून नहीं खौल रहा है?
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) December 18, 2023
हद कर दी है pic.twitter.com/cVqpDkKYox
काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडिओ शेअर करत भाजपला सवाल केला आहे. बजरंगबली यांना क्रेनवर लटकवून, त्यांच्या हातांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत केल्यानंतर ढोंगी लोकांचा रक्त खवळत नाही का? असा प्रश्न श्रीनेत यांनी विचारला आहे. भाजपाकडून धर्मावर आधारित राजकारण केलं जातं, त्यामुळे काँग्रेसने या व्हिडिओवरुन भाजपला ट्रोल केलं आहे. सध्या, हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.